मीरा रोड : खड्ड्यामुळे दुचाकीचे अपघात होण्याचं प्रमाण पावसात वाढतं. मात्र तरिही खड्डे बुजवण्यात प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचं आणखी एका अत्यंत दुर्दैवी घटनेतून अधोरेखित झालंय. मीरा रोडमध्ये (Mira Road Accidnet) एक भीषण घटना घडली. एक तरुण दुचाकीवरुन जात होता. खड्ड्यात (Killer Pothole) त्याची दुचाकी गेल्यानं तरुणाचा तोल गेला. तोल गेल्याने हा तरुण रस्त्यावर कोसळला. इतक्याच मागून येत असलेल्या एसटी चालकाला ब्रेक लावण्याइतकाही वेळ मिळाला नाही. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एसटी तरुणाच्या शरीरावरुन धडधडत गेली. यात तरुणाचा जागीच जीव गेला. काशीमीरा वाहूतक पोलीस (Kashimira Police) ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव मोहनीश अहमद इरफान खान असं आहे. हा तरुण मुंब्राहून मुंबईच्या दिशेने दुचाकीवरुन निघाला होता. मात्र वाटेतच काळानं त्याच्यावर घाला घातला.
मंगळवारी सकाळी घोडबंदर रोड काजूपाडा या ठिकाणी हा अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर रस्त्यावरील खड्डे चुकवत दुचाकीस्वार जात होता. मात्र एका खड्ड्यानं या तरुणाचा घात केला. खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा तोल गेला आणि रस्त्यावर पडला. याच वेळी मागून येणाऱ्या एसटी चालकाला गाडी कंट्रोल करण्यातइतकाही वेळ मिळाला नाही. मागून येणाऱ्या एसटीने रस्त्यावर तोल जाऊन कोसळलेल्या तरुणाचा चिरडलं आणि तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
काशीमीरा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी या अपघाताबाबतची माहिती दिली. या अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केली. या अपघातामुळे तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरन्यान, या दुर्दैवी घटनेनंतर या मार्गावरील वाहतूकही बराच वेळ खोळंबली होती. अखेर पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मोहीत राबवली. या अपघात प्रकरणी पोलिसांनी 304 अ नुसार गुन्हा नोंदवला आहे.
मंगळवारी मुंबईसह ठाणे वसई विरार या सगळ्याच भागाला पावसानं झोडपून काढलं. अशातच धुव्वाधार पावसाने ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्याच्या घटनांची नोंद करण्यात आली. दरम्यान, खड्ड्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागण्याची आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर आता दुचाकीस्वारांना पावसात अधिक खबरदारी आणि सतर्कता बाळगत गाड्या चालवण्याचं आवाहन केलं जातंय.
शक्यतो पावसाच्या साचलेल्या पाण्यातून गाडी चालवणं टाळावं. पाणी साचलेल्या ठिकाणी खड्डा असण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी पाण्यामधून गाडी हाकणं, जीवघेणं ठरु शकतं. पावसात अनेकदा रस्ते निसरडे झालेले असतात. त्यामुळे वेगानं वाहनं चालवू नयते. गाडी तत्काळ कंट्रोल होऊ शकेल, इतक्या वेगानेच चालवावी. अत्यंत जोराचा पाऊस असल्यास शक्यतो वाहनं काही काळ एका बाजूला थांबवावं.