अंबरनाथ (ठाणे) : ठाणे जिल्ह्यात वारंवार मोबाईल स्नॅचिंगच्या घटना समोर येत आहेत. विशेष म्हणजे ट्रेनमध्ये एका चोरट्याने महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला असता त्या महिलेचा ट्रेनखाली पडून मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. तसेच ठाण्याच्या तीन हात नाक्यावर रिक्षात असलेल्या महिलेच्या हातून बाईकवरुन आलेल्या दोघांनी मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला असता चालत्या रिक्षातून पडून संबंधित महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनानंतरही कल्याणमध्ये मोबाईल चोरांच्या अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना अनेकदा समोर आल्या. पोलिसांनी मागे एका आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. पण तरीही चोरट्यांना अद्दल घडताना दिसत नाही. अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा तशाच एका घटनेची पुनरावृत्ती झालीय.
दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल हिसकावत पळ काढल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या टिव्हीएम शाळेजवळ घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. टिव्हीएम शाळेजवळ असलेल्या चौकात एक तरुण बुधवारी (20 ऑक्टोबर) रात्री 12 वाजेच्या सुमारास मोबाईल बघत उभा होता. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अचानक त्याचा मोबाईल हिसकावला आणि धूम ठोकली.
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. चोरटे मोबाईल हिसकावून पळत असताना तरुणाने त्यांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. या घटनेनंतर पोलिसांत अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र मोबाईल चोर आणि सोनसाखळी चोर यांच्यावर जरब बसवण्यात पोलीस कुठेतरी कमी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे.
VIDEO : अंबरनाथमध्ये चोरट्यांनी चौकात उभ्या असलेल्या तरुणाच्या हातून मोबाईल हिसकावला#crime #ambernath #cctv pic.twitter.com/4vxiAwXQpU
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2021
दरम्यान, कल्याण शहरातही चोरांचा सुळसुळाट असल्याचं बघायला मिळतंय. कल्याणमध्ये महिला चोरांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे ही एक टोळीच आहे. ही टोळी दुकानामध्ये एकत्र जाऊन सामानाची चोरी करते. त्यांचा चोरीचा प्रकार नुकताच एका कपड्याच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे चार ते पाच महिलांसोबत एक पुरुष देखील असल्याची माहिती आहे. त्याचा चेहरा सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे या आरोपींना पोलीस लवकर पकडतील, अशी आशा केली जातेय.
संबंधित घटना ही कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात घडली आहे. सूचक नाका परिसरात एका कपड्याच्या दुकानात महिला चोरांनी चोरी केली आहे. महिलांनी दुकानात काम करणाऱ्या महिलांना बोलण्यात गुंतवत हजारो रुपयांचे कपडे चोरले. त्यानंतर त्या पसार झाल्या. महिलांच्या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चोरी करणाऱ्यांमध्ये चार महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे.
हेही वाचा :
चंद्रपुरात थरारक अपघात, आठवडी बाजारात घुसली कार, एकाचा मृत्यू, चार जखमी