मुंबई : मुंबई पोलिसांनी शनिवारी तिघांना अटक (Mumbai Crime News) केली. मूळचे बुलडाण्यातील असलेले तिघे पुरुष चक्क किन्नरचा (Fake Transgender) वेश धारण करत होते आणि महिलांना लुटायचे. ही धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासातून उघड झाली आहे. याप्रकरणी तिघा जणांना बेड्या घालण्यात आल्या असून पोलिसांनी तिघांचीही कसून चौकशी केली जातेय. तृतीयपंथी असल्याचं भासवून तिघे जण नुकतीच प्रसूती झालेल्या महिलेच्या घरी जायचे. बाळाला पाहायचे. बाळाचं काहीही बरंवाईट होऊ शकतं, असं सांगून काळ्या जादूचा धाक दाखवत महिलांची फसवणूक करण्याचा गोरखधंदा हे तिघे जण करत होते. बाळाच्या प्रकृती बाबत चिंता व्यक्त करुन आईला घाबरवायचं आणि तिच्याकडून दागिने लुटायचे, असा प्रकार या बोगस किन्नर असलेल्या पुरुषांकडून चालवला जात होता. या सगळ्याचा अखेर पर्दाफाश करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तीनही पुरुषांचं वयही चकीत करणारं आहे. यातील एक जण 24 वर्षांचा असून इतर दोघे 29 आणि 38 वर्षांचे आहेत. अंधेरीत (Andheri MIDC Police) एका महिलेला तिघांनी अशाच प्रकारे लुटलं होतं. पण त्यानंतर या महिलेच्या पतीला हे सगळं बनावट असल्याचा संशय आल्यामुळे त्याने पोलिसांत तक्रार दिली. अखेर पोलिसांच्या तपासातून या तिन्ही पुरुषांचा भांडाफोड झालाय.
अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांनी तिघा पुरुषांना अटक केली. या तिघांचं नाव भानुदास सावंत, वय 29, महेंद्र नागनाथ, वय 38 आणि प्रकाश शिंदे, वय 24 अशी आहेत. या तिघांनी तीन दिवस आधी प्रसूती झालेल्या एका महिलेल्या घरचा पत्ता मिळवला. तिच्या घरी गेले. तुझ्या बाळाला धोका आहे, त्याची तब्बेत बिघडू शकते, असं म्हणत अल्का प्रजापती या 28 वर्षांच्या महिलेला भीती घातली.
मुलाची काहीही बरं वाईट होऊ नये, यासाठई महिलेला सोन्याचे दागिने एका हळदीच्या कागदात बांधण्यास सांगितलं. त्यानंतर त्याची पुढी करुन ठेवण्यात सांगितलं. ही पुढी उघडली तर मुलाच्या तब्बेतीवर परिणाम होईल, अशी भीती तृतीयपंथी बनून आलेल्या पुरुषांनी महिलेला घातली.
महिलेला आपल्या बोलण्यात गुंतवून त्यांनी तिच्याकडून 51 हजार रुपयांचे दागिने लुटले. हळदीत दागिने ठेवून त्याची पुडी देवाजवळ ठेव असं महिलेला सांगितलं. ही पुडी काहीही करु उघडू नको, असंही महिलेला त्यांनी बजावलं होतं. ही घटना 6 जुलै रोजी घडली. दुपारी साडेतीन वाजता या तिघांनी अंधेरीत राहणाऱ्या प्रजापती दाम्पत्याच्या पत्ता मिळवला होता. या दाम्पत्याला बाळ झालं आहे, याची माहिती त्यांना आधीपासूनच होती. प्रजापती यांच्या घरी जाऊन तीन दिवसांपूर्वीच प्रसूती झालेल्या या महिलेला घाबरवून त्यांनी दागिने लंपास केले होते.
दरम्यान, अल्का प्रजापती यांच्या पतीला हे सगळं प्रकरण ऐकल्यानंतर शंका आली. त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे या तृतीयपंथींचा शोध घ्यायचं ठरवलं. पण पोलिसांच्या तपासातून तृतीयपंथी म्हणून घरी आलेले पुरुषच होते, हेही उघडकीस आलंय. हे तिघेही जण बुलडाण्यातील असून ते साडी देऊन घरोघरी जात. नवीन बाळ जन्माला आलेल्या घरात जाऊन ते महिलांना घाबरवत आणि त्यांच्याकडून दागिने लुटत. महत्त्वाचं म्हणजे एखाद्या प्रसूतीगृहातून किंवा दवाखान्यामधूनच कुठे नवं बाळ जन्माला आलंय, याबाबत माहिती तिघे मिळवत होते, असाही पोलिसांना संशय आहे. त्यातून प्रसूती झालेल्या महिलांच्या घराचा पत्ता आणि त्यांची इतर माहितीही त्यांना मिळत होती, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे 6 जुलै रोजी प्रजापती दाम्पत्य हे आपल्या बाळाला बरं वाटत नाही, म्हणून दवाखान्यात घेऊन गेले होते. तिथे जाऊन त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेतलेली. हीच माहिती बरोबर या तिघांना मिळाली आणि त्यांनी प्रजापती यांचं घर गाठलं असावं, अशी शक्यता आहे. या तिघांना अटक केल्यानंतर अशाप्रकारे लुटमार करणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे. त्या अनुशंगाने पोलिसांनी आपल्या तपासाला सुरुवात केलीय. अशाप्रकारे फूस लावणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आणि सतर्कता बाळगण्याचं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलंय.