जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, 6 जणांना अटक, मुंबईतील धक्कादायक घटना

| Updated on: Jul 24, 2024 | 4:07 PM

त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या मित्रालाही मारहाण झाली. रविवारी (21 जुलै) रात्री दहाच्या दरम्यान ही घटना घडली.

जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, 6 जणांना अटक, मुंबईतील धक्कादायक घटना
Follow us on

Chembur Murder Case : जुन्या वादातून सहा जणांच्या टोळीने एकावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील चेंबूर परिसरात घडली आहे. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या मित्रालाही या टोळीने मारहाण केली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. या दोघे सराईत आरोपी आहेत.

नेमकं प्रकरण काय?

चेंबूर परिसरातील मुकुंद नगर भागात जुन्या वादातून एका तरुणावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सिद्धार्थ कांबळे (32) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ कांबळेवर सहा जणांच्या टोळीने हल्ला केला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या मित्रालाही मारहाण झाली. रविवारी (21 जुलै) रात्री दहाच्या दरम्यान ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सिद्धार्थ कांबळे आणि आरोपी हे सर्वजण एकमेकांच्या परिचयाचे आहेत. त्यांच्या पूर्वीपासून वाद होता. याच वादातून आरोपींनी सिद्धार्थला बेदम मारहाण केली. त्यात विकासने मध्यस्थी करुन त्यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. पण या सहा जणांनी या दोघांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाले होते. त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान सिद्धार्थचा मृत्यू झाला. तर विकासवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सहा आरोपींना अटक

या घटनेनंतर पोलिसांनी हल्ल्यानंतर पळून गेलेल्या सहाही आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणी ते सर्वजण पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सिताराम शहाजी जगताप, सुरेश ऊर्फ सुरज शहाजी जगताप, रुपेश जयंत वैराळे, सागर तुकाराम कांबळे, सुधाकर जगन्नाथ अवसरमल, रुपेश तुकाराम कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी सिताराम जगताप, सुरेश जगताप आणि रुपेश वैराळे हे तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. यात सिताराम विरुद्ध 6, सुरेशविरुद्ध 3 तर रुपेश विरुद्ध एका गुन्ह्यांची नोंद आहे. हे सर्वजण चेंबूर परिसरात राहतात.