मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर भन्नाट वेगाने दुचाकी हाकणाऱ्या तरुणांची काही कमी नाही. विशेष म्हणजे या तरुणांना ज्यावेळी पोलीस रोखतात, त्यावेळी पोलिसांसोबत दादागिरी, हाणामारी करणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. अशा उद्धट दुचाकीस्वारांना (Two Bikers) ताळ्यावर आणण्यासाठी मुंबईतील न्यायालयाने (Mumbai Court) एका प्रकरणात कठोर भूमिका घेत शिक्षा सुनावली. मोहम्मद शकीर अन्सारी आणि असलम मेहंदी हसन शेख अशी दोषींची नावे आहेत. 4 जुलै 2016 रोजी वरळी पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस (Traffic Police) प्रवीण कदम यांच्यावर आरोपींनी हल्ला केला होता.
पोलिसाला कानशीलात लगावणाऱ्या दोघा दुचाकीस्वारांना मुंबईतील सत्र न्यायालयाने सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावला आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने आता निकाल दिला आहे.
मुंबई शहरात वाहतूक नियमावलीच पोलिसांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. पोलीस विशेष मोहिमा राबवून वाहतुकीचे विविध गुन्हे रोखतात. याच दरम्यान 2016 मध्ये दोन दुचाकीस्वारांना नो एन्ट्री असलेल्या रस्त्यावर दुचाकी चालवण्यापासून रोखले होते.
याचा राग मनातून दोन तरुणांनी संबंधित वाहतूक पोलिसाला मारहाण केली होती. त्या पोलिसाच्या मानेला धरून कानशीलात लगावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयात खटला चालला. त्या खटल्यात न्यायालयाने सहा वर्षानंतर नुकताच निकाल देत दोन्ही आरोपींना सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावला आहे.
वाहतूक पोलीस कदम यांना शेखने जोरदार थप्पड लगावली. त्यावेळी कदम हे खाली जमिनीवर कोसळले. यादरम्यान शेखने कदम यांची मान आवळण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर अन्सारीने कदम यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याचीही धमकी दिली.
या प्रकरणात सरकारी पक्षाने आरोपींविरोधात भक्कम पुरावे सादर केले. त्या पुराव्यांची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. याप्रकरणी दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने दोन्ही आरोपींना सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावला आहे.