लग्नानंतर दुसऱ्या पुरुषासोबत फिरणं खटकलं, पतीनेच काढला पत्नीचा काटा; मुंबईतील धक्कादायक घटना

| Updated on: Dec 31, 2024 | 12:06 PM

मुंबईतील मालाड परिसरात पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने हत्येसाठी वापरलेला चाकू तात्काळ जप्त केला आहे.

लग्नानंतर दुसऱ्या पुरुषासोबत फिरणं खटकलं, पतीनेच काढला पत्नीचा काटा; मुंबईतील धक्कादायक घटना
प्रातनिधिक छायाचित्र
Follow us on

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रातील गुन्हेगारींच्या घटनेत वाढ होत आहे. त्यातच आता मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील मालाड परिसरात पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने हत्येसाठी वापरलेला चाकू तात्काळ जप्त केला आहे. दिंडोशी पोलिसांनी सोमवारी हत्येचा गुन्हा दाखल केला.

नेमकं प्रकरण काय?

मालाड पूर्वमधील कासमबाग या ठिकाणी राहणारा नितीन धोंडीराम जांभळे (३२) आणि कोमल (२५) या दोघांनी 6 वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज केले होतं. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये वाद सुरू होते. त्यातच त्यांच्या कुटुंबियांना हे लग्न मान्य नव्हते. कुटुंबातील नाराजीमुळे ते दोघेही लग्नानंतर वेगळे राहत होते. कौटुंबिक नाराजी आणि पैशांवरून त्यांच्यात सतत वाद होत होते. लग्नानंतर कोमल बाहेरगावी जायची. ती दुसऱ्या एका तरुणसोबत फिरू लागली. त्यांचा एक खासगी फोटो पती नितीनने व्हायरल केला होता. याबद्दल कोमलने पतीविरुद्ध गुन्हाही नोंदवला होता.

नितीन हा अनेकदा आपल्या पत्नीला आपल्यासोबत राहण्यासाठी बोलवत असेल. मात्र ती त्याच्याकडे अधिक पैशांची मागणी करत होती. त्यामुळे तो नाराज व्हायचा. काल संध्याकाळी नितीनने कोमलला भेटण्यासाठी मित्राच्या घरी बोलवले. कोमल त्याला भेटायला गेली असता, तिने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. या वादातून आरोपीने कोमलच्या मानेवर, पाठीवर आणि गळ्यावर चाकूने वार केले. ज्यात पत्नी कोमलच्या मानेवर, पाठीवर, कंबरेवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. खून केल्यानंतर त्याने पत्नीला बाथरुममध्ये बंद केले आणि तिथून पळ काढला. यानंतर कोमलच्या आईला आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केल्यानतंर ही बाब समजली. कोमलच्या आईच्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी भारतीय न्या संहितेच्या कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.

दिंडोशी पोलिसांकडून अटक

नितीन हा बँकेत काम करायचा. तर कोमल ही खासगी नोकरी करत होती. कोमलचे वडील हे मालाड पूर्व या ठिकाणी राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीनला त्याच्या पत्नीवर संशय असल्याचे समोर आले आहे. ती दुसऱ्या व्यक्तीसोबत फिरते याचा त्याला प्रचंड राग होता. नितीन जेव्हा तिला फोन करायचा तेव्हा ती त्याच्याकडे पैसे मागायची. त्यामुळे तो रागावायचा. काल रात्री त्याने तिला त्याच्या मित्राच्या घरी बोलावून तिची हत्या केली. दिंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले आहे. सध्या याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.