मुंबई : लोकल (Mumbai Local News) समोर येऊन आत्महत्येचा (Suicide Attempt) प्रयत्न करण्याचे प्रकार मुंबईत वारंवार समोर येताना दिसतात. अशीच एक थरारक घटना मंगळवारी समोर आली. नवी मुंबईच्या वाशी रेल्वे स्थानकातून एक लोकल सीएसएमटीच्या (Panvel CSMT) दिशेने निघाली होती. मात्र याच वेळी एक महिला रेल्वे रुळांवर आली. काहीतरी विचित्र हालचाल होत असल्याचं पाहून मोटरमनने लगेचच ब्रेक दाबले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना मंगळवारी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी घडल्याचं समोर आलंय.
मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक लोकल नेहमीप्रमाणे पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने रवाना झाली होती. मात्र वाशी रेल्वे स्थानकापासून निघाल्यानंतर काही अंतरावर एक विचित्र प्रकार घडला.
या प्रकारामुळे लोकलच्या मोटरमनला इमर्जन्सी ब्रेक दाबून लोकल थांबवावी लागली. त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटं हार्बर मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झाला होता.
सुदैवानं गर्दीची वेळ नसल्यानं फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र नेमकं घडलंय काय, हे प्रवाशांना कळायला मार्ग नव्हता. अखेर एक थरारक घटना घडल्याचं आता उघडकीस आलंय.
रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल-सीएसएमटी लोकल वाशी रेल्वे स्थानकाच्या जवळ होती. ही लोकल ताशी 40 ते 60 किमी वेगात असल्याचं सांगितलं जातंय. पण त्याचदरम्यान, या लोकलचे मोटरमन प्रशांत कोण्णूर यांना रेल्वे रुळांवर संशयास्पद हालचाल दिसली.
लोकलच्या मार्गात रेल्वे रुळांवर एक महिला प्रशांत कोण्णूर यांना आढळून आली. आपल्या 20 वर्षांचा अनुभव पणाला लावत प्रशांत कोण्णूर यांनी लगेचच ब्रेक लावले. पण गाडीचा वेग पाहता लोकल लगेच थांबणं अशक्य होतं.
अखेर महिला रेल्वे रुळांवर ज्या ठिकाणी आडवी झाली होती, तिथपर्यंत लोकल सरकलीच. लोकलचं समोर असलेलं गार्ड महिलेच्या शरीराला अलगद लागलं आणि इतक्यात गाडी थांबली.
सुदैवानं यात महिलेला कोणतीही दुखापत झाली. महिला अगदी थोडक्यात बचावली. मोटरमन प्रशांत कोण्णूर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला होता. यानंतर लगेचच इतरांनी धाव घेत महिलेला रेल्वे रुळांवरुन बाजूला केलं. स्वतः मोटरमन कोण्णूर यांनी देखील महिलेचा विचारपूस केली.
ही महिला आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी रेल्वे रुळांवर आली असण्याचा संशय व्यक्त केला जातोय. या महिलेची समजूत काढण्यात आली. त्यानंतर त्याच लोकलच्या पहिल्या डब्ब्यात महिलेला बसवून लोकल पुढे रवाना करण्यात आली.
या प्रकारामुळे लोकलला मानखुर्द रेल्वे स्थानकात पोहोचण्यास काहीसा उशीर झाला. पण या घटनेनं एकच गोंधळ उडाला होता. काही काळ हार्बर मार्गावरील वेळापत्रकावर परिणाम झाला असला, तरी महिलेचा जीव वाचवण्यात मोटरमनला यश आलंय. प्रशांत कोण्णूर यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचं आता रेल्वे विभागाकडूनही कौतुक केलं जातंय.