मुंबई : शुक्रवारी पहाटे एका नवऱ्यानं आपल्या बायकोचा (Wife killed by husband in Mumbai) जीव घेतला. बायकोवर धारदार शस्त्राने बारा वेळा भोसकलं आणि तिचा खून (Mumbai Murder News) केला. यामध्ये महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. शुक्रवारी पहाटे ही रक्तरंजित घटना घडली. यावेळी दोघांनी या महिलेच्या पतीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही न जुमानता या पतीनं हैवानी कृत्य करत भर रस्त्यातच तिचा खून केला. बायकोचा खून केल्यानंतरही पती जागच्या जागी निर्दयी माणसासारखा (Psycho killer) उभा होता. तो हत्याकांड केलेल्या ठिकाणावरुन जराही हलला नव्हता. विशेष म्हणजे या दाम्पत्याला एक पाच वर्षांचा लहान मुलगा आणि दोन वर्षांची एक चिमुकली मुलगीही आहे. 28 वर्षांच्या व्यक्तीने आपल्या बायकोचा खून केल्यानं पहाटेच्या सुमारास परिसरात एकच खळबळ उडाली होती.
बायकोचा हैवानी पद्धतीने खून करणाऱ्या मारेकरी पतीचं नाव किरण दाने असं आहे. किरणचं वय 28 वर्ष असून तो मस्जिद बंदर इथं कामाला आहे. एका गोल्ड मेल्टिंग युनिटमध्ये किरण काम करत होते. त्याच्या पत्नीचं नाव महादेवी असं असून किरणने गुरुवारी रात्री उशिरा आपल्या पत्नीला दक्षिण मुंबईत भेटायला बोलावलं होतं.
गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर किरण दाने यांने आपल्या मित्राला सोबत बोलावलं. किरणचा मित्र राजेश पाटील याला किरण पत्नीची हत्या करणार आहे, याची पुसटशीही कल्पना नव्हती. फोर्टपर्यंत ते दोघे एकत्र आले. वाशीहून महादेवी दक्षिण मुंबईत पोहोचली. पण किरणने नेमकं कुठं बोलावलं आहे, त्या जागी पोहोचायचं कसं, हे तिला माहीत नव्हतं. अखेर तिनं अन्सारी नावाच्या एका 35 वर्षांच्या व्यक्तीला याबाबत विचारणा केली. आसिफ अन्सारी हा काम संपवून घरी निघाला होता. पण स्टेशनल आल्यानंतर त्याची ट्रेन चुकली होती. म्हणून तो पुन्हा कामाच्या ठिकाणी परतत असताना त्याची महादेवीशी भेट झाली. त्यावेळी त्याने महादेवी हिला तिच्या इच्छित स्थळी ड्रॉप केलं.
दाने आधीच त्यांच्या मित्रासह तिथं पोहोचलेला हाता. महादेवी येता क्षणीच किरण दाने यांनं चाकू काढला आणि थेट महादेवीला भोसकलं. एकामागोमाक एक बारा वार किरणने महादेवीवर केले. यात तिच्या छातीवर, पोटावर आणि हातावर वार करण्यात आले होते. या हल्ल्याने बिथरलेल्या राजेश पाटील आणि असिफ अन्सारीने किरणला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो एक नाही ऐकला. त्याने सपासप वार सुरुच ठेवले होते. महादेवीचा जीव जाईपर्यंत त्याने तिला भोसकलं. तब्बल 12 वार किरणने महादेवीवर केले होते.
प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असिफ अन्सारीने पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी महादेवीला त्यांनी जीटी हॉस्पिटलमध्ये हलवलं. पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. हल्ल्यात जखमी झालेल्या राजेश पाटील आणि असिफ अन्सारी यांच्यावर जीटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या हल्ल्यानंतर पोलिसांनी किरण दाने याला अटक केली असून हत्येनंतर किरण त्याच ठिकाणी विक्षिप्त अवस्थेत उभा होता. तो जागेवरुन हललाही नव्हता, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून किरण आणि महादेवी एकमेकांपासून वेगळे राहत होते. किरण दाने आणि त्याच्या पत्नीमध्ये नेमका काय वाद झाला होता, हे कळू शकलेलं नाही. मात्र हे दाम्पत्य मूळचं सांगली जिल्ह्यातलं आहे. महादेवी आपल्या मुलांना पतीच्या भावाकडे वाशीमध्ये सोडून आली होती. मात्र आता किरणने केलेल्या धक्कायक कृत्याने या दाम्पत्याच्या मुलांचं काय होणार, असा प्रश्न उपस्थित झालाय.