मुंबई / 19 जुलै 2023 : टाटा रुग्णालयातील रुग्णांची लूट केल्याची घटना ताजी असतानाच अंधेरीतील ब्रम्हकुमारी रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डीएन नगर रुग्णालयात कलम 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलावती यादव असे लुटण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत रुग्णालया प्रशासन कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम येथील रहिवासी कलावती यादव या वृद्ध महिलेला श्वास घेण्याचा त्रास होत होता. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ अंधेरीतील ब्रम्हकुमारी रुग्णालयात नेले. तेथे गेल्यावर डॉक्टरांनी तात्काळ ईसीजी करण्यास सांगितले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कलावतीला कॅज्युल्टी वॉर्डमध्ये नेले. यानंतर महिलेला आयसीयुत दाखल करण्यास सांगितले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर परिचारिकेने महिलेच्या अंगावरील सर्व सोन्याचे दागिने काढून तिच्या पतीच्या हातात दिले. पतीने जेव्हा दागिने पाहिले तेव्हा सोन्याचे मंगळसूत्र आणि अंगठी गायब होते. कलावती यांच्या पतीने परिचारिकेकडे विचारणा केली असता तिने नकार दिला. जे दागिने होते ते आपण दिल्याचा दावा परिचारिकेने केला.
यानंतर कलावती यांच्या पतीने घरीही मंगळसूत्र शोधले, मात्र सापडले नाहीत. मग नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात कलावती वॉर्डमध्ये गेल्यानंतर दोन परिचारिका पडद्यामागे काहीतरी करताना दिसल्या. रुग्णालय प्रशासनाने प्रकरणाची चौकशी करुन कळवतो असे सांगितले. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही. यानंतर कलावती यांच्या कुटुंबीयांनी डीएन नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.