मुंबई / 25 जुलै 2023 : वैवाहिक वादातून पत्नीची हत्या करणाऱ्या डॉक्टरला मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. डॉ. उमेश बाबोळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या 4 वर्षाच्या मुलाची साक्ष महत्वपूर्ण पुरावा मानत न्यायालयाने शिक्षा सुनावली. उमेश बाबोळे हा दंतचिकित्सक असून, त्याने डिसेंबर 2016 मध्ये चाकूने 38 वार करत पत्नीची हत्या केली होती. सात वर्षे हा खटला न्यायालयात चालला. अखेर सोमवारी न्यायालयाने यावर शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी आरोपीला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
डॉ. उमेश बाबोळे आणि त्याची पत्नी तनुजा दोघेही विभक्त राहत होते. घटनेच्या दिवशी उमेश पत्नीला तिच्या घरी भेटायला गेला होता. त्यानंतर पत्नी आणि मुलाला घेऊन सिनेमा पहायला गेले. तेथून रात्री उशिरा घरी परतले. घरी आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि उमेशने किचनमधून चाकू आणला आणि पत्नीवर वार करुन तिची हत्या केली. हा सर्व प्रकार उमेशच्या 4 वर्षाच्या मुलासमोर घडला.
यानंतर आरोपीने स्वतः पोलील कंट्रोल रुमला फोन करुन हत्येची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहिले असता तनुजा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाचा पंचनामा करत मोबाईल, चाकू आणि इतर पुरावे ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. यानंतर मुंबई सत्र न्यायालयात या हत्या प्रकरणी खटला चालू होता.
खटल्यादरम्यान आरोपीच्या वकिलाने सर्व आरोप खोडून टाकण्याचा प्रयत्न केला. आरोपीने मानसिक तणावातून हे कृत्य केल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी एका मानसोपचार तज्ज्ञालाही न्यायालयात हजर करत मानसिक केसचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीच्या 4 वर्षाच्या मुलाची साक्ष महत्वपूर्ण मानत खटला दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची साक्षही सबळ पुरावा मानत हा निर्णय सुनावला. सरकारी पक्षाने 10 साक्षीदार तपासत हा सुनियोजीत हत्या असल्याचे ठामपणे सांगितले. तनुजा हिने त्याआधी उमेशविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.