मुंबई / 18 ऑगस्ट 2023 : मालाडमध्ये पाळीव कुत्र्यावर अॅसिड फेकल्याप्रकरणी अखेर त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. शाबिस्ता सुहेल अन्सारी असे आरोपी महिलेचे नाव आहे. मालवणी पोलिसांनी महिलेविरुद्ध कलम 429 भादंवि 11(1) (अ) प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 सह कलम 119 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अॅसिड हल्ल्याचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यावरुन पोलिसांनी महिलेवर कारवाई करत तिला अटक केली आहे.
मुंबईतील मालाड परिसरातील सामना नगर येथील मालवणी स्वप्नपूर्ती इमारतीत मानवतेला काळिमा फासणारी ही घटना घडली. सदर कुत्रा ब्राउनी मांजराशी खेळत होता. खेळताना त्याने रागाच्या भरात मांजरीला जखमी केले होते. यामुळे संतापलेल्या आरोपी महिलेने त्याच्यावर अॅसिड टाकले होते. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. कुत्र्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा सर्व प्रकार इमारतीतील सीसीटीव्हीत कैद झाला होता.
याप्रकरणी फिर्यादी बाळासाहेब तुकाराम भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12.25 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बाळासाहेब भगत यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी महिलेला अटक केली असून, पुढील कारवाई करत आहेत. महिलेच्या या कृत्यामुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.