मुंबई / 5 ऑगस्ट 2023 : सौदी अरेबियाहून मुंबईला येत असताना विमानात नको ते कृत्य करणं एका प्रवाशाला महागात पडलं आहे. विमान प्रवासादरम्यान सिगारेट ओढल्याप्रकरणी एका 26 वर्षीय तरुणाला सहारा पोलिसांनी अटक केली आहे. कवराज तगत सिंग असे अटक केलेल्या प्रवाशाचे नाव आहे. तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. आयपीसी कायद्याच्या कलम 336 (इतरांचे जीव किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे) आणि विमानाच्या 25 (विमानाच्या कोणत्याही भागात किंवा त्याच्या परिसरात, ज्यामध्ये धुम्रपान निषिद्ध असल्याचे सूचित करणारी नोटीस प्रदर्शित केली जाते) अंतर्गत सिंगवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
इंडिगो एअरलाईन्सचे विमान 3 ऑगस्ट रोजी दुबईहून मुंबईला येत होते. याच विमानातून कवराज सिंग हा प्रवास करत होता. यावेळी प्रवासादरम्यान सिंग हा टॉयलेटमध्ये गेला आणि सिगारेट ओढू लागला. टॉयलेटमधून अचानक धूर आणि दुर्गंधी येत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी टॉयलेटमध्ये जाऊन पाहिले असता आत लायटर आणि सिगारेटचा तुकडा दिसला. कर्मचाऱ्यांनी सिंगला याबाबत विचारणा केली.
विमान मुंबई विमानतळावर येताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ करवाज सिंग याला सहारा पोलिसांच्या ताब्यात दिले. विमानात धुम्रपान करण्यास मनाई करण्याबाबत उड्डाण कर्मचार्यांकडून स्पष्ट सूचना असूनही सिंग याने विमानाच्या शौचालयात धुम्रपान केले. यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. सिंग याच्या या कृत्यामुळे अन्य प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.