मुंबई / 19 जुलै 2023 : परळ येथील टाटा रुग्णालयात गोरगरिब कर्करोगग्रस्तांच्या लुटीचा प्रकार उजेडात आला आहे. कमी दरातील वैद्यकीय चाचण्यांसाठी गोरगरिब लोक टाटा रुग्णालयात येतात. मात्र या गरीब रुग्णांना वैद्यकीय चाचण्यांसाठी खाजगी लॅबमध्ये पाठवून कमिशनचे पैसे उकळले जातात. वॉर्ड बॉयपासून ते सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत या लुटमारीचे जाळे विस्तारले होते. सुरक्षारक्षकांनी सतर्कता दाखवून टाटा रुग्णालयातील लाचखोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मदत केली. याप्रकरणी भोईवाडा पोलिसात 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 11 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
टाटा रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी गरीब रुग्णांप्रतिची सामाजिक बांधिलकी जपत हे रॅकेट उघडकीस आणले. सरकारी रुग्णालयात कमी दरात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय चाचण्यांसाठी कर्करोगग्रस्तांना खाजगी निदान केंद्रात पाठवले जात होते. हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आला. सुरक्षारक्षकांनी दोघा वॉर्डबॉयच्या संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवली होती. ज्यावेळी ते दोन वॉर्डबॉय रुग्णालय आवाराच्या बाहेर गेले आणि वैद्यकीय निदान केंद्राच्या कर्मचाऱ्यांसोबत सौदा करत होते, त्याचवेळी त्यांना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडे 3 लाख रुपयांची रक्कम सापडली. यानंतर सुरक्षारक्षकांनी रुग्णालय प्रशासनाला या गैरव्यवहाराची माहिती दिली.
गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय चाचण्यांसाठी खाजगी लॅबमध्ये पाठवायचे. त्यासाठी कमिशन घ्यायचे. असा हा गोरखधंदा छुप्या पद्धतीने सुरु होता. दर आठवड्याला कामाचे कमिशन घ्यायचे. ही रक्कम 3 ते 4 लाखांच्या घरात असायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, वॉर्ड बॉय, शिपाई आणि सफाई कर्मचारी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
संदीप हरिश्चंद्र गावकर, दिनेश रामचंद्र मोहिते, महेश मंगल सोळंकी, फिरोज इक्बाल खान, जितेंद्र भरनवाल, दिनेश रामफेर कलवार, राहुल सुशील जाधव, आनंद रवी तंगास्वामी, सदानंद नरसिंह सपलिंगा, रविमोहन परदेशी, राहुल वसंत महायवंशी, नारायण रूपसिंग चौधरी, विकास गमरे, राजेश प्रकाश बारिया, राकेश सज्जन परदेशी, सूर्यकांत आबाजी थोरात, आतिष अशोक सोनवणे, अश्विनी अनिल कासले, साकीर आशिक सय्यद, सुनील बंडू चाळके आणि नरेश यांचा समावेश आहे. याशिवाय, इन्फिनिटी डायग्नोसिस सेंटरचे संजय सोनवणे आणि इतर डायग्नोस्टिक सेंटर्सच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.