मुंबई / 2 ऑगस्ट 2023 : वांद्रे वरळी सी-लिंकवरुन उडी घेतलेल्या व्यावसायिकाचा अखेर शोध लागला आहे. दादर येथील शिवाजी पार्क येथील समुद्रात व्यावसायिकाचा मृतदेह आज तरंगताना आढळला. टिकम माखिजा असं मयत व्यावसायिकाचे नाव आहे. सोमवारी पहाटे 5.30 वाजता माखिजा यांनी सी-लिंकवरुन उडी घेतली होती. यानंतर नौदलाकडून त्यांचा शोध सुरु होता. अखेर अथक परिश्रमानंतर पोलीस, अग्निशमन दल, तटरक्षक दल आणि नौदलाच्या पथकाने टिकम यांचा मृतदेह शोधून काढला. शिवाजी पार्क येथील समुद्रात मृतदेह तरंगत होता.
माखिजा हे खार पश्चिमेला पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. त्यांचा गारमेंटचा व्यवसाय होता. सोमवारी पहाटे ते मेव्हण्याच्या गाडीने वांद्रे-वरळी सी-लिंकवर गेले. त्यांनी गाडी सी-लिंकवर उभी केली आणि समुद्रात उडी घेतली. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली होती. माखिजा शोध घेण्यासाठी नौदलाचे हेलिकाॅप्टर पाचारण करण्यात आले होते. हेलिकाॅप्टरच्या माध्यमातून माखिजा यांचा समुद्रात शोध सुरु होता.
माखिजा यांनी कोणत्या कारणातून असे टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत. माखिजा यांनी व्यावसायिक तणावातून टोकाचे पाऊल उचलले की घरगुती कारणातून? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. चौकशीअंती सर्व सत्य समोर येईल. पोलीस नातेवाईकांचीही चौकशी करत आहेत.