मुंबई / 18 ऑगस्ट 2023 : मुंबईच्या ताडदेव परिसरात वृद्ध दाम्पत्याची लूट आणि महिलेच्या मृत्यू प्रकरणी तीन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर प्लानच्या मास्टरमाईंडला राजस्थानमधून अटक केली आहे. ताडदेव स्थित युसूफ मंजिल इमारतीत राहणाऱ्या सुरेखा अग्रवाल या महिलेचा लुटीदरम्यान मृत्यू झाला होता. चोरीच्या उद्देशाने आरोपींनी वृद्ध दाम्पत्याला डांबून ठेवत घरातील दागिने आणि पैसे लुटले होते. ताडदेव पोलिसांनी घटनेचा तपास सुरु करत आरोपींचा शोध सुरु केल होता. अखेर आरोपींना अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. सुरेंद्रसिंह उर्फ संजू, राजू उर्फ राजाराम मेघवाल आणि सुमित अशी आरोपींची नावे आहेत.
मुंबईच्या ताडदेव परिसरामध्ये स्थित युसुफ मंजिल या इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये 70 वर्षीय सुरेखा अग्रवाल आणि तिचे पती 75 वर्षी मदन मोहन अग्रवाल हे वृद्ध दाम्पत्य एकटेच राहत होते. 12 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता दाम्पत्य नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघाले होते. दरवाजा उघडताच तीन आरोपी त्यांच्या घरात घुसले आणि त्यांनी दोघांना दोरीने बांधून ठेवलं. त्यानंतर त्यांच्या तोंडात कापड कोंबून तोंडावर टेप चिटकवली. घरातील सोने आणि मौल्यवान वस्तू घेऊन तिन्ही आरोपी तेथून पसार झाले.
आरोपी गेल्यानंतर मदन अग्रवाल यांनी कसेबसे दरवाजापर्यंत पोहचत सेफ्टी अलार्म वाजवला. यानंतर शेजारी धावत आले. त्यांनी बेशुद्धावस्थेत पडलेल्या सुरेखा अग्रवाल यांना तात्काळ नायर रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी 20 टीम बनवणयात आल्या होत्या. पोलिसात वेगाने तपासचक्रे फिरवत आरोपींना अटक केली. चौथ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.