गोविंद ठाकूर, विजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी मुंबई / 31 जुलै 2023 : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आज पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एका आरपीएफच्या एएसआयसह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या तीन प्रवाशांपैकी दोघांची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले आहे. कादर भानपुरावाला आणि असगर अशी दोघांची नावे आहेत. कादर हे नालासोपारा येथील रहिवासी आहेत, तर असगर हे मूळचे बिहारमधील रहिवासी आहेत. गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी कळताच दोघांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नातेवाईक करत आहेत.
कादर पुनावाला हे नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील तेज प्रतिमा इमारतीत आपल्या कुटुंबासह राहतात. कादर हे मोहरमनिमित्त जयपूरला नातेवाईकाकडे गेले होते. तेथून जयपूर-मुंबई एक्सप्रेसने मुंबईला परतत असतानाच ही घटना घडली. विशेष म्हणजे काही वेळात ते आपल्या इच्छित स्थानकाजवळ पोहचणार इतक्यातही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कादर यांच्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना धक्का बसला. कुटुंबीयांनी तात्काळ शताब्दी रुग्णालयाकडे धाव घेतली.
दुसरा मयत असगर हा मूळचा बिहारमधील मधुबनी येथील असून, कामाच्या शोधात तो जयपूरहून मुंबईला येत होते. असगर यांना चार मुलं आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कामानिमित्त ते मुंबईत येत होते. आरोपीने असगरवर चार गोळ्या झाडल्या. पोलिसांनी असगरच्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करुन मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. असगरच्या कुटुंबीयांनी आरोपीला कोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच असगरवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्याची मागणी करत सरकारकडे नुकसान भरपाई मागितली आहे.