मुंबई : पोलिसांवर (Mumbai Police) होणारे हल्ले काही नवे नाहीत. मात्र पोलिसांवर (Attack on Maharashtra Police) होणारे हल्ले हे कायदा सुव्यवस्थेवर झालेल्या हल्लासारखे आहेत, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. पोलिसावर हात उचलणं कायदा सुव्यवस्थेच्या कानशिलात मारल्यासारखं असल्याचं कोर्टानं म्हटलंय. मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai session Court) एक सुनावणी पार पडली. त्यादरम्यान, मुंबई सत्र न्यायालयानं हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. तसंच पोलिसावर हात उगारणाऱ्याला चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 11 हजार रुपयांच्या दंड ठोठावण्यात आला आहे. चकीत करणारी बाब म्हणजे तब्बल 11 वर्षानंतर मुंबई सत्र न्यायालयानं आरोपीला शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या निकालामुळे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसावर हात उचलणाऱ्यांना आतातरी चाप बसतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मुंबई सत्र न्यायालयात 2011 सालच्या एका प्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. 10 मार्च 2011 रोजी सायन रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या एका एटीएम जवळ भांडण सुरु होतं. दोघांमध्ये सुरु असलेल्या भांडणावर पोलिसांची नजर पडली.
यावेळी कर्तव्यावर असलेल्या हवालदार कल्पेश मोकल आणि पोलीस शिपाई कांबळे हे भांडण सोडवण्यासाठी गेले. तेव्हा अनिल घोलप यानं पोलिसांसोबत हुज्जत घातली होती. इतकंच काय तर या आरोपीनं पोलिसांच्या कानशिलात लगावली होती.
पोलिसांवर हात उगारल्याप्रकरणी घोलप यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गेल्या दहा वर्षांपासून मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला असून आरोपीला कोर्टानं दणका दिला आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या वाहतूक पोलिसांवर हल्ले होत असल्याचे व्हिडीओ समोर आले होते. एका वाहतूक पोलिसाला महिलेनं मारहाण केली होती. तर एका पोलिसाला वाहन चालकानं थेट बोनेटवर बसवून, पोलिसांचा जीव वेठीस ठरला होता. दरम्यान, आता पोलिसांनी याप्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पोलिसांवर हात उगारणं हे कायद्याच्या कानशिलात लगावण्यासारखं असल्याचं कोर्टानं म्हटलंय. यानंतर तरी पोलिसांवरील हल्ले थांबतात का, हे पाहणं आता महत्त्वाचंय.