मुंबई : अंधेरीतल्या डी एन नगर परिसरात एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट पासपोर्ट सेंटरचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश करत दोघांना अटक केली आहे. इम्तियाज अनिस शेख (64) आणि सुधीर सूर्यकांत सावंत (32) अशी या अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून तब्बल 28 बनावट पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. आरोपी एका फ्लॅटवरच बनावट पासपोर्ट आणि बनावट व्हिसा बनवण्याचं काम करत होते. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने ही कारवाई करत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. इमिग्रेशन आणि इतर यंत्रणांच्या डोळ्यात धुळफेक करत या बनावट पासपोर्टच्या माध्यमातून देशाबाहेर कोण कोण गेलंय याचीही चौकशी आता मुंबई पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
हे बनावट पासपोर्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या प्रथम पानांची कलर प्रिंटआऊट, 414 बनावट रबरी शिक्के, जे जे रुग्णालयसारख्या सरकारी रुग्णालयाचे शिक्के, 28 बनावट पासपोर्ट, 24 बनावट व्हिसा, पासपोर्टसाठी लागणारे पेपर आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलंय.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील इम्तियाज शेख (64) हा आरोपीला अशाच प्रकाराच्या एका गुन्ह्यात दिल्ली पोलिसांनी अटक केलेली होती. मात्र तिथून तो सुटल्यानंतर त्याने मुंबईत येऊन हा धंदा पुन्हा सुरू केल्याचे समोर आलंय.
या गुन्ह्यात काही एजंटही सहभागी असल्याचं पोलिसांच म्हणणं आहे. गुन्हे शाखेकडून लवकरच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. बनावट पासपोर्टच्या आधारे परदेशात जर कोणी गेलं असेल तर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, पोलीस निरीक्षक अजित गोंधळी, सहायक पोलीस निरीक्षक अमोल माळी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी या बनावट पासपोर्ट प्रकरण उघडकीस आणलं आहे.