टी सीरिजचे मालक गुलशम कुमार हत्या प्रकरणातील सह-आरोपी इम्तियाज दाऊद मर्चंट याला पोलिसांनी अटक केली होती. इम्तियाज दाऊद मर्चंट हा गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्र्यात लपून बसला होता. तो मुंब्र्यातील दस्तगीर मंजिल येथे राहून ड्रग्ज विक्रीचा काळा धंदा करत होता. पोलीस त्याच्या शोधात होते. पोलिसांकडून ड्रग्ज विक्रिच्या विरोधात कडक कारवाई सुरु आहे. त्यामुळे मुंब्र्यात ड्रग्ज विक्री करणाऱ्या तसेच तशी टोळी चालवणाऱ्यांच्या शोधात पोलीस होते. पोलिसांकडून सातत्याने या प्रकरणी कारवाई सुरु होती. अखेर या प्रकरणी पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांना या प्रकरणात अखेर मोठा मासा गळाला लागला आहे. हा आरोपी साधासुधा आरोपी नसून त्याच्या नावावर धक्कादायक आरोप आहे. विशेष म्हणजे हा आरोपी ड्रग्ज विक्री करत होता. त्याला पोलिसांचं भय राहिलेलं नाही, असं यातून सिद्ध होतं.
गुलशन कुमार यांची 12 ऑगस्ट 1997 मध्ये हत्या करण्यात आली होती. गुलशन कुमार यांची हत्या करण्याआधी त्यांच्याकडे खंडणी मागण्यात आली होती. यानंतर गुलशन कुमार यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. या हत्या प्रकरणात इम्तियाज दाऊद मर्चंट हा सह आरोपी होता. इम्तियाज मर्चंट याचा सख्खा भाऊ अब्दुल रौफ मर्चंट हा गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. इम्तियाज मर्चंट हा आणखी जैन उद्दीन चौगुले हत्या प्रकरणात सह आरोपी होता.
इम्तियाज मर्चंट याच्यावर कलम 325 आणि इतर किरकोळ गुन्हे देखील यापूर्वी दाखल आहेत. बऱ्याच दिवसांपासून इम्तियाज मर्चंट हा मुंब्रा डायघर हद्दीत लपून एमडी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत एमडी पावडर विक्रीचे आणि सेवन यासंदर्भात 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एनडीपीएस पथकामार्फत अंमली पदार्थ विक्री तसेच सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई मुंब्रा पोलिसांमार्फत करण्यात येत आहे. याप्रकरणी कारवाई करत असताना पोलिसांनी इम्तियाज दाऊद मर्चंट याला अटक केली. पोलिसांना इम्तियाज याच्याकडून 1 लाख रुपयांची 60 ग्रॅम मोफिडीन (एमडी) पावडर जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.