नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. गटार साफ करतेवेळी दोघा कामगारांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या कामागाराची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तिसऱ्या मजुरावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रासायनिक उग्र वासामुळे या कामगारांचा मृत्यू झालाय. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कामगारांच्या मृत्यूप्रकरणी कंपनीच्या सुपरवायझरला अटक केली आहे.
संदीप हांबे आणि विजय झारखंड अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या निष्पाप कामगारांची नावे आहेत. तर सोनोत हॉदसा या कामगाराची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते मृत्यूशी झुंज देत आहेत.
रबाळे एमआयडीसी येथील पोफॅक कंपनीच्या समोर ही घटना घडली. बीट कॉईन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे कामगार गटार साफ करण्याचं काम करत होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. गटारातील रासायनिक उग्र वासामुळे कामगारांचा साफसफाई करताना श्वास कोंडला गेला आणि त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या कामगारांच्या मृत्यूनंतर या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी बॉट कॉईन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या सुपरवायझरच्या विरोधात गुन्हा दाखल करुन घेत त्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सुपरवायझरचं नाव दत्तात्रय गिरधारी असं आहे. गिरधारी याला 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नवी मुंबई येथे एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या अनधिकृत पद्धतीने रसायन मिश्रित पाणी नेहमीच गटारात सोडतात. या बाबीकडे साफ दुर्लक्ष होत असल्यामुळे दोघा कामगारांना नाहक आपला जीव गमवावा लागला असल्याचं बोललं जातंय.
याधीही अनेकदा गटार साफ करताना कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. मात्र त्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचं धक्कादायक वास्तव या रबाळे येथील घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झालंय.