नवी मुंबई : मुंबई एपीएमसी भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये बऱ्याच व्यापाऱ्यांकडून खंडणी गोळा करणाऱ्या गँगस्टर अरुण गवळीच्या हस्तकाला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. अशोक हंसराज सोनकार उर्फ अशोक मिर्ची असं त्याचं नाव आहे. नवी मुंबई येथील एपीएमसी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या अशोक हंसराज सोनकर उर्फ अशोक मिर्ची याला पोलिसांनी आज (22 जुलै) सकाळी 7.30 वाजता अटक केली.
आरोपी अशोक मिर्ची हा कृष्णा बार समोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून कल्पना बार येथून ताब्यात घेतला. आरोपी अरुण गवळी यांचा हस्तक असून तो या टोळीचा सभासद आहे. शिवाय एपीएमसी पोलीस ठाण्यात त्याच्यावर जवळपास 11 गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त निवयक वत्स यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामगुडे, सहायक पोलीस निरीक्षक खोपीकर, पोलीस नाईक संतोष खरात व पोलीस शिपाई रवींद्र जगदाळे यांनी ही कारवाई केली.
भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या बऱ्याच व्यापाऱ्यांकडून मिर्ची याने खंडणी गोळा करत होता. व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी घाबरत होते. त्यासाठी आतापर्यंत कोणी तक्रार केली नव्हती. एका व्यापाऱ्याकडून खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्याने त्याला धमकी दिली होती. या प्रकरणी पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांना माहिती मिळताच आरोपीला ताब्यात घेण्यात आले. एपीएमसी पोलिसांनी आरोपी मिर्चीला कोर्टात हजर केला असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
अशोक मिर्चीवर एपीएमसी पोलीस ठाण्यात 12 गुन्हे तर इतर पोलीस ठाण्यात 10 एकूण 22 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुमेध खोपिकर यांनी दिली आहे.
Navi Mumbai Police arrest Ashok Mirchi member of Arun Gawali gang