नवी मुंबई : नवी मुंबईतून दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत बाल गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 9 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत दोन गुन्हेगारांना पकडण्यात आलं आहे. तर तिसरा आरोपी हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे या टोळीला यापूर्वीदेखील अटक झाली आहे. अल्पवयीन असल्याचा फायदा त्यांच्याकडून घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
नेरुळ व उलवे परिसरात वास्तव्याला असलेले काही बाल गुन्हेगार वाहनचोरी करीत असल्याची माहिती मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्याद्वारे गुन्हे शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह भोसले, सहायक निरीक्षक राजेश गज्जल, हवालदार लक्ष्मण कोटकर आदींचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते.
पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन चोरांची चौकशी केली असता त्यांनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली. त्यामधील 9 मोटरसायकल या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या दुचाकी त्यांनी ठाणे, नवी मुंबई परिसरातील त्यांच्या मित्रांकडे लपविल्या होत्या. त्यांचा अल्पवयीन तिसरा साथीदार पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. या अल्पवयीन टोळीने यापूर्वीदेखील शहरात वाहनचोऱ्या केल्या आहेत. त्यामध्ये यापूर्वीदेखील त्यांना अटक झालेली आहे. यानुसार आजवर या टोळीकडून 20 हून अधिक दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
गुन्हा करुनही केवळ अल्पवयीन असल्याने आपल्यावर कठोर कारवाई होत नसल्याचा फायदा या टोळीकडून घेतला जात आहे. त्यामुळे पोलिसांची कारवाई झाल्यास बालसुधारगृहात राहून आल्यानंतर ते पुन्हा वाहनचोरी करायचे. चोरलेल्या मोटरसायकल मौजमजेसाठी वापरल्यानंतर, त्या ओळखीच्या मित्रांकडे ठेवून द्यायचे. त्यामुळे एकापेक्षा अधिक गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन मुलांबाबत देखील कठोर कारवाईची कायद्यात तरतूद करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या अल्पवयीन मुलांच्या टोळीपैकी एकाने शहरातून मुलीचे अपहरण देखील केले असल्याची माहिती समोर येत आहे. सदर मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओडून राज्याबाहेर पळवून नेले असल्याचे समजते. यातून सदर अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचेही सूत्रांकडून समजते. त्याद्वारे या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखा पोलीस त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी उल्हासनगरात पोलिसांनी एका अल्पवयीन दुचाकी चोराला अटक केली होती. तो फक्त मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करायचा, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली होता. विशेष म्हणजे उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी आणि मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलीस चोरट्यांच्या मागावर होते. यावेळी एक अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. हा चोरटा केवळ मौजमजा म्हणून दुचाकी चोरायचा. दुचाकी चोरुन ती फिरवायची आणि जिथे त्यातलं पेट्रोल संपेल, तिथेच ती टाकून द्यायची, असा त्याच्या दिनक्रम सुरू होता.
आरोपीने अशाच पद्धतीने त्याने चार दुचाकी चोरल्या होत्या. एका दुचाकीसह त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याने उर्वरित तीन दुचाकी कुठे कुठे टाकून दिल्या, याचा ठावठिकाणा पोलिसांना सांगितला. स्वतःची दुचाकी घेणं परवडत नसल्याने आपण लोकांच्या दुचाकी चोरुन फिरवायचो आणि स्वतःची हौस भागवायचो, अशी कबुली या चोरट्याने पोलिसांसमोर दिली आहे. या चोरट्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे.
हेही वाचा :
पप्पा देवाघरून येत नाहीत म्हणून देवाघरी जायचा निर्णय; माय-लेकीचा गळफास, चुटपूट लावणारी सुसाईड नोट
बेडवरुन महिला रुग्ण गायब, सुरक्षा रक्षकानं बाथरुमची झडती घेतली तर धक्कादायक घटना उघड