रवी खरात, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई : नवी मुंबईचं (Navi Mumbai Accident News) प्रवेशद्वार असलेल्या वाशी टोलनाक्यावर (Vashi Toll) रविवारी भीषण अपघात घडला. या अपघाताचं थरारक सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर आलंय. एक डंपर टोलसाठी उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगेत विचित्र पद्धतीने घुसला. तब्बल 12 वाहनांना या डंपरने धडक दिली. त्यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं. या अपघातानंतर वाशी टोलनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
भरधाव डंपरचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. या अपघाताचं अंगावर काटा आणणारं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं. त्यात थरकाप उडवणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या अपघातामध्ये दोघे जण जखमी झाले. त्यांच्यावर महानगर पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Navi Mumbai Accident CCTV | टोलनाक्यावर डंपरची 12 गाड्यांना धडक, घटना सीसीटीव्हीत कैद#NM #navimumbai #vashi #tollnaka #accident #cctv pic.twitter.com/6Hjm9TXIo0
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 26, 2022
या अपघातानंतर डंपर चालकाने पळ काढला. पण त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. डंपर चालकाने आधीच गाडीतून उडी टाकल्याचाही अंदाज बांधला जातोय. कारण डंपरमधील ड्रायव्हरच्या बाजूला असलेला दरवाजा उघडा असल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय.
एसटी बस, टेम्पो, कार आणि काही दुचाकी या डंपरने चिरडल्या. एका कारमधील दोघा जणांना या अपघातात गंभीर जखम झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर अनेकजण अगदी थोडक्यात या अपघातातून बालंबाल बचावले. मात्र त्यांच्या वाहनांचं नुकसान झालं.
सायन-पनवेल महामार्गावर डंपरचे अपघात होणं, ही काही आता नवी बाब राहिलेली नाही. नुकताच जुईनगर इथेही डंपरचा झाला होता. दोन डंपर एकमेकांना धडकले होते. अपघाताची ही घटना ताजी असतानाच आता टोल नाक्यावरच झालेल्या अपघातानं अनेक डंपर चालकांवर सवाल उपस्थित केलेत.
रविवारी दुपारी तीन-साडे तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. टोलनाक्यावर वाहतूक कोंडी होऊन वाशी पुलापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या मार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांनीही प्रयत्नांची शर्थ करावी लागली.