मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आज (23 ऑगस्ट) दुपारी ईडी कार्यालयात जाताना दिसते. पटेल यांची काही प्रॉपर्टी ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. याच प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात दाखल झाले. पण ते कार्यालयात फार वेळ न थांबता स्वाक्षरी करुन परत निघाले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांना अडवले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
“खूप दिवसांपूर्वी जी प्रॉपर्टी त्यांनी जप्त केली होती त्याच प्रॉपर्टीच्या कन्फर्मेशनसाठी त्यांना स्वाक्षरी हवी होती. फारसं काही नाही”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
वरळी येथे सीजे हाऊस (CJ House) नावाची मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक छोटीशी इमारत होती. ही इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. या कंपनीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केली होती. त्या मोबदल्यात प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांना काही जागा आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दिली होती. या व्यवहारात गैरप्रकार झालाचा संशय ईडीला आहे. त्यामुळे पैशांची अफरातफर झाल्याचा बोट ठेवून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास सध्या ईडी करत आहे. ईडीने याप्रकरणी कारवाई करत इक्बाल मिर्चीच्या काही नातेवाईकांना अटक केली आहे. तसेच त्याच्या काही कर्मचाऱ्यांनाही अटक केली आहे. ईडीने इक्बाल मिर्ची याची मालमत्ता देखील जप्त केली आहे. प्रफु्ल्ल पटेल यांनी सीजे हाऊसमधील जी मालमत्ता इक्बाल मिर्चीला दिली होती ती मालमत्ता देखील ईडीने जप्त केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेची 2019 मध्ये निवडणूक पार पडली. या निवडणुकीआधी काही नेत्यांना ईडीने नोटीस बजावली होती. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा देखील समावेश होता. तसेच प्रफुल्ल पटेल यांचंही नाव समोर आलं होतं. त्यावेळी प्रफुल्ल यांनी इक्बाल मिर्चीसोबत व्यवहार केल्याचं पहिल्यांदा प्रसारमाध्यमांसमोर कबूल केलं होतं.
“हो मी मिर्ची परिवारासोबत आर्थिक व्यवहार केला. मी काहीही चुकीचे केलेले नाही. हा जो काही व्यवहार झाला तो कायदेशीररित्या झाला”, असं पटेल म्हणाले होते.
पटेल पुढे म्हणाले, इक्बाल मिर्ची ज्याच्याकडे प्रॉपर्टी होती, याचा आमच्याशी काही संबंध नाही. सगळी कागदपत्रे पब्लिक डोमेनमध्ये आहेत. मिर्ची यांना 1999 मध्ये पासपोर्ट मिळाला, ते युएईला जाऊन आले. त्यामुळे त्यांच्याशी व्यवहार करणे अवैध आहे असं नाही. ही फक्त पर्यायी जागा होती. कोर्टाच्या आदेशानुसार ती जागा मिळाली.
मिर्ची हे भारताचे नागरिक आहेत. ते नियमित टॅक्स भरतात. मी 2007 मध्ये सगळी पार्श्वभूमी तपासली होती, त्यांच्याबरोबर व्यवहार करण्यात काही कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खात्री केल्यानंतर मी कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. त्यामुळे आमच्या संबंधावर वाद उपस्थित करणे गैर आहे, असंही पटेल म्हणाले होते.
संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :
हेही वाचा :
आई-बहिणीला इंजेक्शन देऊन संपवलं, आत्महत्येचा प्रयत्न करणारी 30 वर्षीय डॉक्टर बचावली
ज्योती देवरे ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठा ट्विस्ट, भावाच्या मित्राने क्लिप व्हायरल केल्याचा दावा