मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टाने प्रदीप शर्मा यांना दिलासा देणारा निर्णय आज दिला. शर्मा यांच्या विरोधात केलेली वैद्यकीय समिती स्थापन करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. प्रदीप शर्मा यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र एनआयएने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात अर्ज करून प्रदीप शर्मा यांच्या प्रकृतीची तपासणीकरीता विशेष वैद्यकीय समिती स्थापन करण्याची मागणी एनआयएने केली होती. मात्र सदर मागणी मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टात आज सुनावणी झाली. या दरम्यान एनआयएचे वकील सुनील गोन्साल्विस यांनी प्रदीप शर्मा यांची प्रकृती ठीक असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. अनेक महिन्यांपासून प्रदीप शर्मा यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मात्र शर्मा यांच्या प्रकृतीची तपासणी करण्याकरीता विशेष डॉक्टरांचे पथक स्थापन करण्यात यावे अशी मागणी देखील एनआयएतर्फे करण्यात आली होती. मात्र विशेष एनआयए न्यायाधीश ए.एम. पाटील यांनी ही मागणी फेटाळून लावली.
तसेच प्रदीप शर्मा यांच्या प्रकृतीबाबत ससून रुग्णालयातील डिन यांना वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दुसरीकडे प्रदीप शर्मा यांच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.