मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे केव्हा तुरुंगातून बाहेर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनिल देशमुख यांनी विशेष सीबीआय न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र त्यांच्या अपिलाला आक्षेप घेत सीबीआयने उच्च न्यायालयात आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यांनी विशेष सीबीआय न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र त्यांच्या अपिलाला आक्षेप घेत सीबीआयने उच्च न्यायालयात आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
सीबीआयने प्रतिज्ञापत्र सादर केल्यामुळे अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात अनिल देशमुख यांच्या विरोधातील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे दावे केले आहेत.
सीबीआयने अनिल देशमुख यांच्या अपिलावर आक्षेप घेत बरेच गंभीर दावे केले आहेत. आर्थिक अफरातफर प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर झाला असेल, तर त्या जामिनाच्या आधारे आरोपी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनासाठी दावा करू शकत नाही, असे म्हणणे सीबीआयने मांडले. या केंद्रीय तपास यंत्रणेने देशमुख यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांचे स्वरूप गंभीर असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
आरोपपत्रासोबत जोडलेले तोंडी तसेच कागदोपत्री पुरावे हे अनिल देशमुख यांचा आर्थिक गैरव्यवहारातील सहभाग सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत, असाही दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. सीबीआयचे पोलीस उपाधीक्षक मुकेशकुमार यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
अनिल देशमुख यांना गेल्या वर्षी दोन नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेला चौकशीदरम्यान आवश्यक ते सहकार्य केलेले नाही.
कथित गैरव्यवहार प्रकरणातील सत्य उजेडात आणण्यासाठी इतर आरोपींसोबत चौकशी करतानाही देशमुख यांनी योग्य ते सहकार्य केलेले नाही, असा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. या प्रतिज्ञापत्रामुळे अनिल देशमुख यांना सीबीआयच्या प्रकरणात जामीन मिळतो की नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत
विशेष सीबीआय न्यायालयाने अनिल देशमुख यांना दिवाळीपूर्वी जामीन मंजूर करण्यास नकार दिला होता. त्या निर्णयाविरुद्ध देशमुख यांनी उच्च न्यायालयातील दाखल केले आहे.
हे अपील देशमुख यांचे वकील एडवोकेट अनिकेत निकम आणि एडवोकेट इंद्र पाल सिंग यांनी शुक्रवारी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र न्यायमूर्तींनी देशमुख यांच्या अपिलावर सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे देशमुख यांना दुसऱ्या न्यायमूर्तीपुढे अपील दाखल करावे लागणार आहे.