मुंबई : घाटकोपर येथील परख हॉस्पिटलच्या कॉम्प्लेक्समध्ये तळमजल्यावर आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. दुपारी 2 वाजून 8 मिनिटांनी आगीची घटना घडली. आगीची घटना घडताच हॉस्पिटलमधील 25 रुग्णांना राजावाडी रुग्णालयात सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्नीशमन दलाला यश आले आहे.
घाटकोपर पूर्व येथील गणेश सोसायटीत परख हॉस्पिटल आहे. या इमारतीच्या तळमजल्याला ही आग लागली होती. शॉकसर्किटमुळे ही आग लागली असून, या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचा कल्लोळ उठला होता. संपूर्ण इमारतीत आणि रुग्णालयात धुराचे साम्राज्य पसरले.
या धुरामुळे इमारत आणि परख हॉस्पिटलमधील रुग्ण आणि नागरिक अडकून पडले होते. स्थानिक पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने या सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले. या धुराचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागल्याने सर्व रुग्णांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
चार रुग्ण या आगीच्या धुरामुळे गंभीर जखमी झाले असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कुरेशी देडिया असे मयत इसमाचे नाव आहे. आगीचे वृत्त कळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
अग्नीशमन दलाकडून बचावकार्य पार पाडण्यात आले आहे. या आग प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.