पनवेल : राज्यातील रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गुरुवारी पहाटे एका दुर्दैवी बातमीने उरण तालुक्यातील आवरे गावातील स्थानिकांना मोठा धक्काच बसला. या गावातील दोघा जिगरी मित्राचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास त्यांचा कार अपघातात जीव गेल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. दोघे जिगरी दोस्त अर्टिंगा कारने घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या कारचा अपघात होईन दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मोहिंदर गावंड आणि अलंकार पाटील अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघा मित्रांची नावे आहेत.
मोहिंदर आणि अलंकार हे दोघे पनवेल परिसरात मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे गेले होते. तिथून ते पुन्हा घरी परतत होते. परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला.
सहा महिन्यांपूर्वीच नव्याने घेतलेल्या अर्टिगा कारने ते निघाले होते. या कारने घरी येत असताना पुष्पक नगर परिसरात त्यांचा अपघात घडला. कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार जाऊन कठड्याला जोरदार आदळली. ही धडक इतकी जबर होती, अपघातात दोघांच्याही डोक्यात गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याचा जागीच जीव गेला.
या अपघातात त्यांच्या कारच्या समोरच्या बाजूची काच, दर्शनी भाग, याचा चक्काचूर झाला आहे. कारच्या झालेल्या नुकसानीवरुन कार किती वेगाने कठड्यावर आदळली असेल, याची कल्पना करता येऊ शकेल. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात आवरे गावातील दोन तरुण ठार झाल्यानं आता हळहळ व्यक्त केली जातेय.
गेल्या दोन दिवसांत राज्यात अपघाताचं सत्र पाहायला मिळतंय. आज सकाळीही औरंगाबादमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर लातूर नांदेड महामार्गावर झालेल्या अपघातात तब्बल 7 वाहनं जळून खाक झाली. यात एकाचा मृत्यू देखील झाला.