पनवेल : सराफा दुकानातील डिलिव्हरी बॉयवर हल्ला करुन हल्लेखोर 1200 ग्रॅम सोन्यासह पसार झाले. पनवेल शहरातील जोशी आळी येथील गोकुळ गोल्ड सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या सोन्याचे पॉलिश करणार्या दुकानाजवळ हा प्रकार घडला. डिलिव्हरी बॉय आपल्या ताब्यातील सोनं खाली घेऊन जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यात अवजड वस्तूने प्रहार केला. त्यानंतर त्याच्याकडील सोन्याची बॅग हिसकावून ते बाईकवरुन पसार झाले. बॅगेमध्ये साधारणतः 1200 ग्रॅम सोने, ज्याची अंदाजे किंमत 60 ते 70 लाख रुपये असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
पनवेल शहरातील जोशी आळी येथील गोकुळ गोल्ड सोसायटीमधील पहिल्या मजल्यावर रावसाहेब पांडुरंग कोळेकर यांचे सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश देण्याचे दुकान आहे. त्या ठिकाणी काम करणारा 35 वर्षांचा कर्मचारी दीपेश जैन हा दुकानातील सोनं बॅगेत भरुन दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास खाली उतरत होता. यावेळी दोघा जणांनी त्याला जिन्यामध्येच गाठले आणि त्याच्या डोक्यात पिस्तुलाचा दस्ता मारला. त्यानंतर त्याच्या हातात असलेली सोन्याची पिशवी खेचून नेत ते मोटार सायकलवरुन पसार झाले. पिशवीत साधारणतः 1200 ग्रॅम सोने असण्याची शक्यता आहे.
हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद
हल्ल्यात दीपेश जैनने रक्तबंबाळ झाला, तरी तशाच परिस्थितीत त्याने चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते गल्लीतून पसार झाले. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, वपोनि अजयकुमार लांडगे, वपोनि बी.एन.कोल्हटकर, वपोनि गिरीधर गोरे, वपोनि रवींद्र दौंडकर यांच्यासह विविध पथके घटनास्थळी पोहोचली आहेत.
संबंधित बातम्या :
पोलीस असल्याचं भासवलं, एसटी थांबवली, दमदाटी करत चौघांना खाली उतरलं, सिनेस्टाईल 1 कोटी रुपये पळवले