नालासोपारा (पालघर) : दोन दिवासांपूर्वी (21 ऑगस्ट) नालासोपाऱ्यात एका ज्वेलर्समध्ये भर दिवसा सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दरोडा टाकून आणि ज्वेलर्स मालकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. आरोपींना पोलिसांची भीतीच नाही, अशी चर्चा सुरु झाली होती. तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वाचावरण होतं. अखेर नालासोपारा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपींनी भरदिवसा सकाळी 11 वाजता ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकून, मालकाचे हातपाय बांधून, धारदार हत्याराने ज्वेलर्स मालकाची हत्या केली होती. त्यानंतर ते फरार झाले होते. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या 12 टीम तयार करण्यात आल्या होत्या. या टीम विविध ठिकाणी जावून तपास करत होते. या दरम्यान घटनास्थळ, रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे दोन दिवसात आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
नालासोपारा पश्चिमेतील साक्षी ज्वेलर्समध्ये शनिवारी सकाळी दोन चोरट्यांनी ज्वेलर्स लुटीच्या उद्देशाने प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी ज्वेलर्स मालक किशोर जैन (37) यांची हत्या केली. त्यानंतर त्यांनी ज्वेलर्समधील सोने लुटले आणि पळून गेले. विशेष म्हणजे भर दिवसा अकरा वाजता ही घटना घडली. त्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली असून त्यांना पोलिसांची कोणतीही भीती नाही, अशी चर्चा स्थानिकांमध्ये होती. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
ज्वेलर्स मालकाच्या हत्येनंतर आरोपी पळून गेल्यानंतर परिसरातील नागरिकांना या घटनेची माहिती मिळाली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वेळेचा विलंब न करता तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ज्वेलर्स मालकाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेथ दुकानात आढळला. ज्वेलर्सच्या दुकानात त्यांच्या कुटुंबियांनी टाहो फोडत आक्रोश सुरु होता. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ज्वेलर्समधील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. यावेळी सीसीटीव्हीत सर्व प्रकार कैद असल्याचं स्पष्ट झालं होतं. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी दोन दिवसात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा :
अंडरवर्ल्डच्या इक्बाल मिर्चीसोबत व्यवहार, प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात, नेमकं प्रकरण काय?