मुंबई : अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपाखाली अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्रा याला आज (27 जुलै) न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. त्याची रवानगी आता जेलमध्ये करण्यात आली आहे. त्याने जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे. त्याच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज कुंद्रा याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला मोठा धक्का बसला आहे. क्राईम ब्रांचचे अधिकारी राज याला घेऊन त्याच्या घरी गेले तेव्हा त्यावेळी शिल्पा सतत रडत होती. तिने रडत रडतच आपला जबाब दिला आहे. याबाबत माझ्या नवऱ्याने मला काहीही सांगतील नव्हतं, असं तिचं म्हणणं होतं.
राज कुंद्रा याला 19 जुलैला अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून तो गेली आठ दिवस पोलीस कोठडीत होता. त्यानंतर त्याला आज (27 जुलै) न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. म्हणजेच त्याला आता तळोजा जेलमध्ये पाठवलं जाणार आहे. राज कुंद्रा याच्या विरोधात अश्लील चित्रपट बनवल्याचा गंभीर आरोप आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या गुन्ह्यात 9 जणांना अटक झाली होती. त्यानंतर आता राज कुंद्रा आणि रॉयन थोरपे या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 11 झाली आहे.
राज कुंद्रा आणि रॉयन थोरपे यांना आज (27 जुलै) रिमांडसाठी तिसऱ्यादा हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकील एकनाथ ढमाल यांनी क्राईम ब्रांचच्या वतीने युक्तिवाद केला. “राज कुंद्रा याच्या घरी झडती घेतली असता त्याठिकाणी एक हार्ड डिस्क सापडली आहे. त्याचप्रमाणे त्याचा मोबाईल जप्त केला आहे. त्याच्या कार्यलयात अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्या आहेत. त्यांच्या तपासासाठी आम्ही फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक केली आहे. फॉरेन्सिक ऑडिटर समोर याचा तपास करायचा आहे. त्याचप्रमाने आरोपींचे सिटी बँक आणि कोटक बँकेत खाती आहेत. ती आम्ही सील केली आहेत”, अशी माहिती वकिलांनी दिली.
आरोपींचा हॉटशॉट अॅप हा पूर्वी गुगल आणि अॅपल यावर दिसायचा. त्यावेळी त्यांना या अॅपकडून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. त्यांना अॅपलकडून 1 कोटी 17 लाख 64,886 रुपये मिळाले होते. तर गुगलकडून किती पैसे मिळाले, याचा आम्ही शोध घेत आहोत. मिळालेले पैसे आम्ही सील केले आहेत. आरोपींनी अनेक महिलांची फसवणूक केली आहे. ते आता पुढे येत आहेत. त्यामुळे आरोपीची कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकील एकनाथ ढमाल यांनी केली. मात्र, कोर्टाने ती नामंजूर केली.
दरम्यान, पॉर्न फिल्म बनवण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा याला अटक झाल्यानंतर त्याच्या कुटुंबात वाद सुरू झाले आहेत. त्याची पत्नी शिल्पा आणि त्याच्यात वाद सुरू झाले आहेत. राज याच्यावर झालेल्या कारवाईचा फटका शिल्पा हिला बसत आहे. ती अनेक कार्यक्रमाची परीक्षक होती. मात्र, तिला आता सर्व काम सोडावे लागत आहेत. शिल्पाचं आर्थिक नुकसान होत आहे. खरं म्हणजे राज याच्यावर झालेला आरोप म्हणजे आपल्याला मोठा धक्का असल्याचं ती म्हणतेय.
अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेटच्या मुद्द्यावर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रामध्ये जोरदार भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदविण्याकरिता राज कुंद्राला पोलीस त्याच्याघरी घेऊन गेले होते. तेव्हा त्यावेळी शिल्पा आणि राज कुंद्रा या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. एवढी सगळी लफडी केली पण मला काही कळू दिलं नाहीस. असं शिल्पा म्हणाली. यावेळी शिल्पा कुंद्रावर भडकली होती. एवढंच नव्हे तर त्यानंतर रडत रडतच तिने स्टेटमेंट दिलं होतं. या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये जेव्हा गुन्हा दाखल झाला होता तेव्हाही शिल्पा आणि राज कुंद्रामध्ये भांडण झालं होतं. या प्रकरणामुळे शिल्पाची प्रतिमा फारच मलिन झाली असल्याची तिला खंत आहे. आतापर्यंतच्या तपासात या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती समोर आलेली नाही, असं क्राईम ब्रांचच्या सूत्रांचं म्हणणं आहे.
संबंधित बातम्या :
अब्जावधींचा रिव्हेन्यू, कोट्यवधींचा नफा, राज कुंद्राच्या कंपनीला भविष्यात तब्बल इतका फायदा?
मुंबई पोलिसांच्या हाती तब्बल 120 नवे अश्लील व्हिडीओ, राज कुंद्राचे पाय आणखी खोलात