मुंबई : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई सुरु आहे. या कारवाईशी संबंधित अनेकांनी आता कोर्टात धाव घेतली आहे. कुणी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी तर कुणी बदनामी टाळण्यासाठी तर राज कुंद्रा याने बेकायदेशीर अटकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर राज कुंद्राच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली.
दुसरीकडे राज कुंद्रा आणि रॉयन थोरपे यांनी त्यांची अटक बेकायदेशीर आहे या मुद्द्यावरुन मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टातील न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. कुंद्रा आणि रॉयन यांचे वकील आबाद फोनडा यांनी युक्तिवाद केला. “आमच्याकडे यापूर्वीही पोलीस चौकशीसाठी आले होते. याप्रकरणी आधीही आमची चौकशी झाली आहे. त्यानंतर 19 जुलैला पोलीस आले. त्यांनी झडती घेतली. त्यानंतर अटक केली”, असं ते म्हणाले.
“आम्हाला RPPC 41 A नुसार नोटीस देणं आवश्यक होतं. मात्र, ती नोटीस देण्यात आली नाही. यामुळे आमची अटक ही बेकायदेशीर आहे”, असं फोनडा यांनी कोर्टाला सांगितलं. आजची सुनावणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे ही सुनावणी आता शनिवारी (31 जुलै) ठेवली आहे. शनिवारी सरकारी वकील आपली बाजू मांडणार आहेत.
मुंबई गुन्हे शाखेने अभिनेत्री शर्लिन शर्लिन चोप्रा हिला समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं होतं. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी त्याला अटक झाली आहे. पोलिसांना याच गुन्ह्याबाबत शर्लिन हिची चौकशी करायची होती. मात्र, तिने चौकशीला सामोरं न जाता थेट अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंबई सेशन कोर्टात अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावून तिला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.
राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही त्याची पत्नी आहे. त्यामुळे राज याला अटक केल्यानंतर या प्रकरणाशी शिल्पा हिचाही संबंध लावला जात आहे. मात्र, या घटनेशी आपला काहीही संबंध नाही, असं शिल्पा सांगत आहे. मात्र, यानंतरही तिच्या विरोधात काही चॅनेल आणि युट्यूब चॅनेलवर शिल्पा हिचा संबंध लावून बातम्या येत आहेत. या विरोधात शिल्पा शेट्टी हिने मुंबई हायकोर्टात सिव्हिल सूट दाखल केला. या याचिकेत तिने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
शिल्पाने याचिकेत 29 जणांना प्रतिवादी केलं आहे. हे प्रतिवादी काही चॅनलचे प्रमुख आहेत. युट्यूब चॅनेलचे प्रमुख आहेत. आपला पॉर्न फिल्म प्रकरणाशी काही संबंध नाही. यानंतर ही प्रतिवादी आपली बदनामी करत आहेत. यामुळे या प्रतिवादी यांना आपल्या विरोधात बदनामी कारक लिखान करण्यास, बातमी बनवण्यास आणि ती छापण्यास, प्रसारीत करण्यास मनाई करावी, असं याचिकेत म्हटलं आहे.