मुंबई : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात शुक्ला (Rashmi Shukla Phone tapping case) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सीआरपीसी कलम 164 अंतर्गत 6 जणांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवले आहेत. या 6 जणांमध्ये त्यावेळच्या एसीएस होम आणि डीवाय एसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे तेच डीवाय एसपी आहेत जे त्यावेळी एसआयडीमध्ये तैनात होते आणि त्यांना टेपिंगची माहिती होती. फोन टॅपिंगच्या माहिती असणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबातून आता नेमकी काय खळबळजनक माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे फोन टॅपिंगसाठी बनावट नावाचा वापर करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितले. संजय राऊत यांच्यासाठी ‘एस रहाटे’ आणि एकनाथ खडसेंसाठी ‘खडसणे’ हे नाव वापरण्यात आलं होतं. या लोकांनी संजय राऊत आणि एकनाथ खडसे (Sanjay Raut & Eknath Khadse) यांच्याशी साधर्म्य असलेली नावे वापरली असल्याचं सांगितलं जातंय.
रश्मी शुक्ला यांनी खोटं बोलून फोन टॅपिंग केल्याचा आरोप करण्यात आला होतं. रश्मी शुक्ला या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी हे फोन टॅपिंग केल्याचा आरोप झाला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी रश्मी शुक्लांवर फोन टॅपिंगचा आरोप केला होता. त्यानुसार रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास केला जातो आहे. याप्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत.
मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र एटीएस आणि लाचलूचपत प्रतिबंधक विभाग या तीन विभागाला फोन टॅप करण्याचे अधिकार आहेत. हे तिन्ही विभाग सलग सहा ते सात दिवस कुणाची रेकी करू शकतात. त्यापुढे त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) यांची परवानगी लागते. परवानगी शिवाय या विभागांनीही फोन टॅपिंग करता येत नाही.
परवानगी नसताना फोन टॅपिंग करणं कायद्यानं गुन्हा आहे. अधिकृत यंत्रणांव्यक्तिरिक्त कुणालाही कुणाचा फोन टॅप करण्याची परवानगी नाही. जर एखादी व्यक्ती असं कृत्य करत असेल तर त्याला तुरुंगवास होऊ शकतो. तसेच वरील एजन्सीही देशद्रोह किंवा गंभीर गुन्ह्याचा संशय असलेल्या व्यक्तिंचाच फोन टॅप करतात. कुणाचाही फोन टॅप करण्याची त्यांना परवानगी नाही. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे कुणाचाही फोन टॅप केला जात नाही. जर कुणी बेकायदेशीररित्या तुमचा फोन टॅप करत असेल तर तुम्ही त्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीररित्या फोन टॅप केला आणि त्याच्याविरोधात पुरावे सिद्ध झाल्यास त्याला तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. तसेच आर्थिक दंडाचीही तरतूद आहे. सध्या रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई पोलिस याप्रकरणी सध्या या आरोपाच्या अनुशंगानं तपास करत आहेत.
Maharashtra | Phones of Shiv Sena leader Sanjay Raut and NCP leader Eknath Khadse were tapped on the pretext of them being anti-social elements: Mumbai Police
(File Pics) pic.twitter.com/5DuS0sIYlX
— ANI (@ANI) April 20, 2022