मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने केलेल्या तक्रार प्रकरणात राखी सावंतला 1 फेब्रुवारीपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. राखी सावंतचा अटकपूर्व जामीन दिंडोशी सत्र न्यायालयानं फेटालळा होता. याला मुंबई उच्च न्यायालयात राखी सावंततर्फे आव्हान देण्यात आला आहे. राखी सावंत विरोधात 1 फेब्रुवारीपर्यंत कुठलीही कठोर कारवाई करू नये असे, निर्देश न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी पोलिसांना दिले. या याचिकेवर पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. शर्लिन चोप्राबाबत आपत्तीजनक वक्तव्ये केल्याचा राखीवर आरोप आहे. मॉडेल, अभिनेत्री शर्लिन चोप्राने राखी विरोधात तक्रार दाखल केली होती.
राखी सावंत हिने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाला शर्लिन चोप्राच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. तसेच यात शर्लिनतर्फे हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात येणार आहे. यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे .
राखी सावंत विरोधात शर्लिन चोप्रा हिने केलेल्या तक्रारीवरून आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील आठवड्यात आंबोली पोलिसांनी राखी सावंतला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली होती.
शर्लिन चोप्राने राखी सावंतवर आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची दखल घेत आंबोली पोलिसांनी राखीवर गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करुनही ती हजर राहत नव्हती. त्यामुळे पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते.
मुंबईच्या सत्र न्यायालयाने राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर पुन्हा एकदा तिला ताब्यात घेण्यात आलं. मात्र त्यानंतर राखीने अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
मात्र दिंडोशी कोर्टाने तिचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर राखी सावंत हिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर राखी सावंतला 1 फेब्रुवारीपर्यंत दिलासा देण्यात आला आहे.