कल्याणमधून धक्कादायक घटना समोर येत आहे. क्लासवरून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीची रिक्षा चालकाकडून छेडछाड करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे धावत्या रिक्षातून उडी मारत विद्यार्थिनीने पळ काढल्यामुळे ती बचावली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाला कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती मिळत आहे.
कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्लासवरून रिक्षाने घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनींची रिक्षा चालकाने छेड काढली. घाबरून या विद्यार्थिनीने रिक्षातून उडी मारत घरच्या दिशेने पळ काढला. मात्र या मुजोर रिक्षा चालकाने तिचा पाठलाग करत या अल्पवयीन विद्यार्थिनीला शिवीगाळ केली. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रिक्षाचालक गोपाळ मुदलीयार याला बेड्या ठोकल्या आहेत.
घटना कल्याण पूर्व परिसरातील असून, विद्यार्थिनीने क्लास संपल्यानंतर घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षात बसल्यानंतर रिक्षाचालकाने मुलीकडे तिचा नंबर मागितला आणि तिच्याशी अश्लील बोलण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने रिक्षा थांबवण्याची विनंती केली, मात्र चालकाने रिक्षा भरधाव चालवली. समोर अचानक दुचाकी आल्याने रिक्षा मंद झाल्यावर, विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत रिक्षातून उडी मारली आणि घरी पळाली.
मात्र, रिक्षाचालकाने तिचा पाठलाग करत तिला धमकावले आणि शिवीगाळ केली. रिक्षा चालकाने मुलीचा घरापर्यंत पाठलाग करत तिला गाठले. तिला शिवीगाळ केली. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गोपाळ मुदलियार या रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. कोळसेवाडी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.