मुंबई : मुंबईच्या साकीनाका बलात्कार प्रकरणी (Sakinaka Rape Case) आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयात पोलिसांकडून आरोपीच्या फाशीची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी दोषीच्या शिक्षेचा मागणी करताच नराधम आरोपी कोर्टातच ढसाढसा रडू लागला आणि शिवीगाळ करु लागला. त्यानंतर कोर्टानं आरोपीला बाहेर हाकलवून लावलं. 32 वर्षांच्या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या (Sakinaka Rape Murder Case) करणाऱ्या आरोपीच्या शिक्षेवर सुनावणी पार पडली. मुंबई सत्र न्यायालयात पार पडलेल्या या सुनावणीदरम्यान, मुंबई पोलिसांनी (Sakinaka crime) नराधम आरोपीला जगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. या आरोपीनं 32 वर्षांच्या एका महिलेवर बलात्कार केला होता. त्यानंतर या महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हत्यार टाकून तिचा खून केला होता. पीडितेच्या वतीनं आणि सरकारी पक्षातून मुंबई सत्र न्यायलयामध्ये बुधवारी युक्तिवाद पूर्ण करण्यात आला होता.
साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणतील प्रमुख आरोपीचं नाव आहे मोहन चौहान. मोहन चौहान हा ड्रायव्हरचं काम करायचा. आता त्याचं वय 45 आहे. बुधवारी त्याच्याविरोधात जेव्हा शिक्षेची मागणी करण्यात आली, तेव्हा मोहन कोर्टरुममध्येच आरडाओरडा करु लागला. अखेर संतापलेल्या न्यायाधीशांनी आरोपीला बाहेर जाण्यास सांगितलं. इतकंच काय तर आरोपीची कोर्टरुममधील बेशिस्त वागणूक पाहून पब्लिक प्रॉसिक्यूटर महेश तुले यांनी या आरोपीक सुधार होण्याची कोणतीही शक्यता नाही, असं म्हटलंय.
मुंबईच्या कंटोरल रुमला 10 सप्टेंबर 2021 ला शुक्रवारी 3.30 वाजून एक कॉल आला होता. एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेली साकीनाका परिसरात आढळून आली होती. तातडीनं पोलीस या महिलेला घेऊन घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात गेले. या महिलेवर उपचार सुरु होते. आयुष्यासोबत सुरु असलेली या महिलेची झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारादरम्यानच तिचा जीव गेला. यानंतर पोलिसांनी बलात्कारासह हत्येचा गुन्हा नोंदवून घेतला होता.
या 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये नराधमानं अमानुषपणे रॉड टाकला होता. यात महिला गंभीर जखमी झाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पूर्ण करत अखेर नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेनंतर दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्याप्रकरणाच्या आठवणींनी सगळ्यांना पुन्हा हारवलं होतं.