मुंबई : तेरा महिन्यांपूर्वीपासून बँडस्टँडहून गायब झालेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थीनीच्या अपहरणाप्रकरणी एका लाईफगार्डलाच अखेर क्राईन ब्रंचने अटक केली आहे. या प्रकरणी मीट्टू सुखदेव सिंग या लाईफगार्डला पोलिसांनी संशयावरून अटक केली आहे. त्याने ती गायब होण्याआधी तिच्या सोबत शेवटचे तीन सेल्फीही काढले आहेत. आता या प्रकरणात पुरावे गोळा करण्याचे आव्हान आहे.
आम्ही भारतीय दंड संहितेच्या कलम 363 ( अपहरण ) आणि 364 (ई) ( खंडणीसाठी अपहरण ) अंतर्गत मिट्टू सुखदेव सिंगला अटक केली आहे. तो तपासात सहकार्य करत नाही, पण त्याच्या चौकशीसाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत असे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी म्हटले आहे. नागपाडा पोलिसांनी यापूर्वी आरोपीवर नार्को विश्लेषण आणि ब्रेन मॅपिंग चाचण्या केल्या होत्या, परंतु अहवाल आलेला नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मीट्टू सिंग याला शुक्रवारी अटक करण्यात आली आणि नंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सर जेजे हॉस्पिटल आणि ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असलेली सदिच्छा साने (22) ही 29 नोव्हेंबर 2021 रोजी विरार स्थानकावरून सकाळी 9.58 वाजता ट्रेनमध्ये चढली होती. दुपारी 2 वाजता तिच्या प्रिलिमसाठी हजर व्हायचे होते. त्यानंतर ती अंधेरीला उतरून अचानक दुसऱ्या ट्रेनमध्ये बसली आणि वांद्रे येथे उतरली आणि तिथून तिने बँडस्टँडला ऑटो घेतला. तिच्या मोबाईल फोनच्या लोकेशनवरून असे दिसून आले की ती दुपारपर्यंत फिरत होती, रात्री उशीरा 12.30 वाजता ताज लँड्स एंडच्या समोरून समुद्रकिनारी जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसते असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
बँडस्टँडला ड्युटीवर असलेल्या लाइफगार्ड 32 वर्षीय मीट्टू सिंग याने तिला पाहिले आणि ती आत्महत्येचा प्रयत्न करू शकते असा संशय घेऊन तिचा पाठलाग केला.आपलाल्या आत्महत्या करायची नसल्याचे सानेने त्याला सांगितले. त्यानंतर सिंगने तिच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली आणि दोघेही 30 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे 3.30 वाजेपर्यंत एका खडकावर बसले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
या सुमारे तीन तासांच्या कालावधीत सिंग यांने तिच्यासोबत चार सेल्फी काढले होते, तर सानेने त्याच्यासोबत एक सेल्फी काढला होता, असे सिंग यांनी पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यात सेल फोनचा फ्लॅश दिसत आहे. ज्यातून सेल्फी घेतल्याचे दिसते आहे, तसेच एकाचा सेल फोनचा टॉर्चमधून आलेला प्रकाश पहाटे 3 च्या सुमारास बँडस्टँडपासून दूर जाताना दिसत आहे. मात्र, अपुऱ्या प्रकाशामुळे तो कोणाच्या फोनचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.
आराेपीकडे पोलीसांचा नंबर असूनही सदीच्छा हरविल्याचे कळल्यानंतर पोलीसांना काही कळवले नाही. तसेच तिला भेटलेला तो शेवटचा व्यक्ती असल्याचे त्याने मान्य केले आहे. पोलीसांनी सर्व सीसीटीव्ही तपासून पाहीले असले तरी बँडस्टँडपासून परतताना ती कोणत्याही सीसीटीव्हीत ती दिसलेली नाही. तिचा सेल फोनही स्वीच केल्याचे आढळल्याने तिला शेवटचा कॉल किंवा संदेश आलेला नसल्याने हा तपास अवघड बनला आहे.