मुंबई : गोवंडीतील मुलींच्या शासकीय पुनर्वसन केंद्रातून सहा मुली (Six Girls) रहस्यमयरित्या गायब झाल्याची घटना उजेडात आली आहे. मुली ज्याप्रकारे बेपत्ता (Missing) झाल्या आहे, त्याचा उलगडा झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. प्राथमिक पोलीस तपासानुसार शौचालयाचे खिडकी व ग्रील तोडून सहा अल्पवयीन मुली पळून गेल्या आहे. रविवारी पहाटे 5 च्या सुमारास ही घटना घडली. मुलींनी स्वतःहून पलायन केले की त्यांच्या बेपत्ता होण्यामागे अपहरणा (Kidnapping)चा कट आहे, याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अल्पवयीन मुलींनी पलायन करण्यापूर्वी अत्यंत सावधगिरी बाळगली होती. त्यांनी वसतिगृहाच्या आवारातून बाहेर पडण्यापूर्वी हवालदाराच्या खोलीचे गेट बाहेरून लॉक केले. जेणेकरून हवालदाराला सुगावा लागल्यावर तो आपला पाठलाग करू नये.
पोलिसांचा पाठलाग टाळण्यासाठी त्यांनी लढवलेली ही क्लुप्ती उघड होताच सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या पलायनामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
पळून गेलेल्या सर्व सहाही अल्पवयीन मुलींची ओळख पटली आहे. त्या आधारे त्यांचा थांगपत्ता लावण्याचे शोधकार्य सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेची गोवंडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुली भल्या पहाटे पळून गेल्याने सर्वचजण चक्रावून गेले आहेत. ही बातमी समजताच परिसरात एकच खळबळ उडाली.
शासकीय पुनर्वसन केंद्राच्या प्रशासनाला मुली बेपत्ता झाल्याचे कळले, त्यावेळी घाईघाईत रजिस्टर तपासण्यात आले. सर्व नोंदी तपासल्यानंतर 6 अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याचे आढळून आले.
रजिस्टरवरील नोंदीमुळे त्यांची वेळीच ओळखही पटली. नंतर मुलींचा शोध घेण्यासाठी पुनर्वसन केंद्र व्यवस्थापनाने हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे सोपवले.
गोवंडी पोलीस सध्या परिसरातील वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, त्याआधारे बेपत्ता मुलींचा थांगपत्ता लावण्याचे काम सुरु आहे. मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न उघड झाल्यास संबंधित लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मानवी तस्करी, भीक मागणे अशा बेकायदेशीर गोष्टी करणाऱ्यांवर वेगवेगळ्या तपास यंत्रणा कारवाई करतात. त्या कारवाईदरम्यान सापडलेल्या अल्पवयीन मुलींची सुटका केली जाते.
तेथून त्या मुलींना आणून गोवंडीच्या अल्पवयीन मुलींचे पुनर्वसन केंद्र असलेल्या या शासकीय वसतिगृहात ठेवण्यात येते.