ठाणे : काही दिवसापूर्वीच व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येने खळबळ उडाली असताना ठाण्यातील चरई भागात आता आणखी एका व्यापाऱ्यांची हत्या झाल्याची घटना घडलीय. चरई या ठिकाणी राहणारे व्यापारी ज्वेलर्स भरत जैन यांचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. व्यापारी भरत जैन 15 ऑगस्टपासून बेपत्ता होते. आता ठाण्यातील मुंब्रा येतिबंदर येथील खाडीत सदरचा मृतदेह सापडला आहे.
व्यापारी भरत जैन यांची हत्या की आत्महत्या असा प्रश्न आता उपस्थित झालाय. याचा तपास ठाणे नौपाडा पोलीस करत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळालीय. या बाबत नौपाडा पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार जैन कुटुंबियांनी दाखल केलेली होती.
व्यापारी भरत जैन यांनी शेवटी 14 ऑगस्ट रोजी पत्नीला व्हॉट्सअप कॉल केला होता. त्यानंतर त्यांचा फोन बंद आला. मात्र, असे देखील समोर आले आहे की 14 ऑगस्टच्या रात्री जैन याच्या ज्वेलरी दुकानात चोरी झाली होती. त्यानंतर त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांनी ओला ड्राईव्हरला ताब्यात घेतले आहे. हा तपास नौपाडा पोलीस करत आहेत.
या प्रकरणी अद्याप मुख्य आरोपी फरार आहे. तसेच जैन यांचे हात पाय बांधून तोंडात रुमाल कोंबून ही हत्या करण्यात आली आहे, असा आरोप कुटुंबियांनी केलाय. याबाबत प्रशासनाने अशा गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जैन यांच्या कुटुंबाने केली आहे.