ठाणे : ठाण्यात एका वृद्ध महिलेची हत्या (Thane Murder) करण्यात आली. ही हत्या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या तरुणानेच केल्याचं उघड झालंय. धक्कादायक बाब म्हणजे हत्या करुन घरी आल्यानंतर तरुणाने आपल्या आईला हत्या केल्याचं सांगितलं. त्यानंतर वृद्ध महिलेकडून आणलेला चोरीचा मालही लपवण्यास तिने मुलाला मदत केली. या खळबळजनक हत्याकांडाचा खुलासा पोलिसांनी (Thane Police) अवघ्या 12 तासांच्या आत केला आहे. तसंच आरोपी तरुणासह त्याच्या आईलाही अटक (Murder Accused arrested) केली आहे. भरवस्तीत घडलेल्या या हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
ठाण्यातील पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी या हत्याकांडाबाबत सविस्तर माहिती दिली. जीजाबाई केदारे असं हत्या करण्यात आलेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे. या महिलेचं वय 65 वर्ष होतं. ही महिला बेपत्ता झाल्याची एक तक्रार पोलिसात दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता या महिलेच्या घराला कुलूप आढळून आलं. अखेर पोलिसांनी कुलून फोडलं आणि घरात जाऊन पाहिलं, तर वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचं निदर्शनास आलं.
शंका आली म्हणून पोलिसांनी याप्रकरणी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या तरुणाने आपल्या जबाबत शंकास्पद उत्तर पोलिसांनी दिली. अखेर चोरीच्या उद्देशाने ताब्यात घेतलेल्या तरुणानेच या महिलेचा खून केल्याचं तपासात उघड झालं. वृद्ध महिलेच्या शेजारी राहणाऱ्या या 27 वर्षीय तरुणाने रात्रीच्या सुमारास महिलेची हत्या केली. त्यानंतर या तरुणाने घरी येऊन आपल्या आईलाही याबाबत सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण कटात आईनेही चोरीचा माल लपवण्यास मुलाला मदत केली. शिवाय ही सगळी माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली.
अखेर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा अवघ्या 12 तासांच्या आत केलाय. या हत्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी नारायण विजयलाल केवट आणि त्याची आई सुभावती विजयलाल केवट यांना अटक केली आहे. श्रीनगर पोलिसांनी ही कारवाई केलीय. सध्या अटक करण्यात आलेल्या मारेकरी तरुणाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचंही पोलिसांनी म्हटलंय. तसंच हा तरुण बेरोजदार होता. तो काहीच काम करत नव्हता. नशेबाज तरुणाने केलेल्या या कृत्याला त्याच्या आईनेही साथ दिल्यामुळे परिसरात खळबळ माजलीय.