ठाणे : वर्तक नगर पोलिसांनी एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात उघडकीस आलेल्या आणखी एका हत्येच्या घटनेनं खळबळ माजली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावं जगदीश नरहीरे, वैभव जगताप, अजय धोत्रे, राकेश हागर्जी आणि प्रदीप चव्हाण अशी आहेत. या पाचही जणांची आता कसून चौकशी केली जातेय. अटक करण्यात आलेले आरोपी हे साईनाथ नगर, भीमनगर आणि वर्तक नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे,
अटक करण्यात आलेल्या नरहिरे याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जीवघेण्या हल्ल्यादरम्यान, जखमी झाल्यानं त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव दीपक निर्भवने असं आहे. विलास अशोक पवार, दीपक आणि प्रशांत अशा तिघांनी मिळूनवर्तक नगर पोलिसांत तक्रार दिली होती. आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
दीपक निर्भवने ही व्यक्ती जीवघेण्या हल्ल्यात जबर जखमी झाली होती. पण उपचारादरम्यान, दीपकचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी या तक्रारीत बदल करुन हत्येचा गुन्हा नोंदवून घेतला.
ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारु पिण्याच्या वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एकूण तिघे गंभीर जखमी झाले होते. त्यात जखमींपैकी विलास, दीपक आणि प्रशांतही होतं. यातील दीपकला गंभीर जखम झाली होती. उपचारादरम्यान, दीपक याचा मृत्यू झाला.
दरम्यान, जीवघेण्या हल्ल्यात दीपकच्या छातीमध्ये धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. त्यामुळे दीपकची प्रकृती गंभीर होती. पण अखेर मृत्यूशी सुरु असलेली त्याची झुंज अपयशी ठरली. दीपकच्या मृत्यूनंतर वर्तक नगर पोलिसांनी आरोपींची शोध घेत 5 जणांना अटक केली.
जीवघेणा हल्ला आणि हत्या केल्यानंतर आरोपींनी पोबारा केला होता. नाशिकच्या दिशेने पाचही आरोपींनी पळ काढला होता. पण पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली आहे. आता अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय.