चित्रपट निर्मात्याची मुले पाकिस्तानात, शोध घेण्यात केंद्राला अपयश; हायकोर्टाने सुनावले हे खडे बोल

| Updated on: Sep 22, 2022 | 12:02 AM

तुमच्या कृतीवर आम्ही समाधानी नाहीत. अशा स्थितीत याचिकाकर्त्याचे काय समाधान झाले असेल. आम्हाला अर्धेअधुरे आश्वासन देऊ नका, 100 टक्के प्रयत्न करा, असे न्यायालयाने केंद्राला बजावले.

चित्रपट निर्मात्याची मुले पाकिस्तानात, शोध घेण्यात केंद्राला अपयश; हायकोर्टाने सुनावले हे खडे बोल
मुंबई उच्च न्यायालय
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : चित्रपट निर्माता मुश्ताक नाडियादवाला (Mushtaq Nadiadwala) यांनी त्यांच्या पत्नीने दोन मुलांना पाकिस्तानात बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेवल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण बुधवारी मुंबई उच्च न्यायालया (Bombay High Court)पुढे सुनावणीला आले. यावेळी न्यायालयाने नाडियादवाला यांच्या याचिकेची गंभीर दखल घेतली आणि केंद्र सरकार (Central Government)ला खडे बोल सुनावले. नाडियादवाला यांच्या मुलांचा अद्याप ठावठिकाणा का लावला नाहीत? आम्हाला तुम्ही प्रयत्न करताय असे सांगत बसू नका, ठोस कृती करा, अशा शब्दांत न्यायालयाने केंद्राला फटकारले.

मुश्ताक नाडियादवाला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती पी. के. चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी नाडियादवाला यांच्या वकिलांनी केंद्र सरकारच्या अपयशावर बोट ठेवत जोरदार युक्तीवाद केला.

खंडपीठाने केंद्र सरकारचे कान उपटले

युक्तीवादाची दखल घेत खंडपीठाने केंद्र सरकारचे कान उपटले. परराष्ट्र मंत्रालयाने केवळ पत्रव्यवहारापुरते प्रयत्न मर्यादित ठेवू नये. नाडियादवालाच्या मुलांना सुखरुप मायदेशी कधी आणणार? याबाबत ठोस आश्वासन द्या.

हे सुद्धा वाचा

आश्वासन देऊ नका, 100 टक्के प्रयत्न करा

तुमच्या कृतीवर आम्ही समाधानी नाहीत. अशा स्थितीत याचिकाकर्त्याचे काय समाधान झाले असेल. आम्हाला अर्धेअधुरे आश्वासन देऊ नका, 100 टक्के प्रयत्न करा, असे न्यायालयाने केंद्राला बजावले.

पत्नीने दोन मुलांना बेकायदेशीर पाकिस्तानात ठेवल्याचा आरोप

मुश्ताक नाडियादवाला यांची पत्नी मरियम चौधरी हिने नऊ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी या दोन मुलांना पाकिस्तानात बेकायदेशीरपणे ठेवले आहे, असा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

त्या मुलांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्याबाबत केंद्र सरकारला निर्देश द्या, अशी विनंती नाडियादवाला यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. आशिष चव्हाण यांनी बाजू मांडली.

परराष्ट्र मंत्रालयाचे इस्लामाबाद भारतीय उच्चायोगाला पत्र

सरकार मुलांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करतेय. नाडियादवाला आणि परराष्ट्र मंत्रालयातील अतिरिक्त सचिव यांच्यात 16 सप्टेंबरला एक बैठक झाली होती. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायोगला पत्र लिहिले आहे.

मुलांचा शोध घेण्यासाठी उच्चायोगाला पत्रातून विनंती केली असून त्या पत्राच्या उत्तराची वाट पाहतोय, असे अ‍ॅड. चव्हाण यांनी न्यायालयाला सांगितले. याप्रकरणी आता तीन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होणार आहे.