मुंबई : गर्लफ्रेंडने सोबत यायला नकार दिला म्हणून माथेफिरु बॉयफ्रेंडने तरुणीसह तिच्या आईवर जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची घटना ठाणे शहरात उघडकीस आली आहे. सुरेश रामदास वाडेकर असे हल्ला करणाऱ्या 22 वर्षीय बॉयफ्रेंड (Boyfriend)चे नाव आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक (Arrest) केली आहे. आरोपीविरोधात कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित 18 वर्षीय तरुणी, तिची आई आणि आरोपी 22 वर्षीय बॉयफ्रेंड तरुणीच्या घोडबंदर येथील घरी राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी शहरात जोरदार पाऊस पडत होता. यावेळी आरोपीने तरुणीला आपल्यासोबत आपल्या घरी चलण्यास सांगितले.
मात्र तरुणीने पावसात बाहेर पडण्यास नकार दिला. पाऊस थांबल्यानंतर जाऊन तरुणीने बॉयफ्रेंडला सांगितले. यामुळे सनकी बॉयफ्रेंड चिडला आणि त्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. यावेळी तरुणीची आई मध्ये पडली असता आरोपीने तिच्यावरही हल्ला केला.
या हल्ल्यात तरुणी आणि तिची आई जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच शेजारी धावत आले. शेजाऱ्यांनी तात्काळ दोघी मायलेकींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
यानंतर आई आणि मुलगी दोघींनी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. तर जखमींवर उपचार सुरु आहेत.