विरार : विरारच्या तानसा नदीत बुडालेल्या तिघा तृतीयपंथीयांपैकी एकाचा मृतदेह 25 तासांनंतर सापडला. हारिका अंदुकोरी असे मृतदेह मिळालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. तर आणखी दोघे तृतीयपंथी अद्यापही बेपत्ताच आहेत. गुरुवारी सकाळी 10 वाजता तानसा नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेले तिघे पाण्यात बुडाले होते. वसई विरार महापालिका अग्निशमन दल, स्थानिक मच्छिमार आणि पोलिसांकडून शोधकार्य सुरुच आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे जवळील तानसा नदीत आंघोळीच्या वेळी ही दुर्घटना घडली. गुरुवारी घटस्थापना असल्याने दुर्गा पूजे निमित्त सहा तृतीयपंथी आंघोळीसाठी तानसा नदीवर आले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील तिघे जण नदीत बुडाले. तर तिघे बाहेर आले. गुरुवारी सकाळी दहा-साडेदहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला होता.
हारिका अंदुकोरी (वय 39 वर्ष) असं मयत तृतीयपंथीयाचं नाव आहे. तर सुनिता गोणामुडी उर्फ पुरी (वय 27 वर्ष), प्राची आकुला (वय 23 वर्ष) हे दोघे बेपत्ता आहेत. वसई विरार महानगरपालिकेची अग्निशमन दलाचे जवान, विरार पोलीस आणि स्थानिक नागरिक त्यांचा शोध घेत आहेत.
नाशिकमध्ये रामकुंड परिसरात चार दिवसांत चौघे बुडाले
दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गोदावरी नदीला चारदा पूर आला. जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे धरणांवर पोलिस बंदोबस्त तैनात करून या परिसरात नागरिकांना फिरकण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. मात्र, नाशिक शहरातील रामकुंड परिसरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्यात गेल्या चार दिवसांत पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाय घसरून पडल्याने चौघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पहिली घटना रामकुंडाजवळच्या गांधी तलावात घडली होती. उत्तम नगरमधल्या गणेश कॉलनीतले महाजन कुटुंब देवदर्शनासाठी आले होते. या कुटुंबातील रावसाहेब महाजन (वय 36) यांचा पाय घसरला आणि ते गोदापात्रात कोसळले. त्यांना शोधण्यासाठी जीवरक्षक जवानांनी खूप प्रयत्न केले. मात्र, पाण्याची पातळी जास्त असल्याने त्यांना अपयश आले. खूप उशिराने त्यांचा मृतदेह हाती लागला. रावसाहेब यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
हेही वाचा :