मुंबईतील एक सर्वात मोठा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. एका ज्वेलर्सने लोकांना 520 टक्के रिटर्न देण्याची लालच दाखवून त्यांच्याकडून करोडो रुपये वसूल केले. अनेकपट नफा मिळत असल्याने त्याचा अनेकांना मोह झाला. पण एका भाजीविक्रेत्यामुळे या ज्वेलर्सचा भांडाफोड झाला आहे. सर्व घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात एकूण तीन जणांना अटक केली असून या घोटाळ्याचा कसून तपास करत आहेत.
दादरच्या शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेस ज्वेलर्सचे संचालक आणि सीईओंच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. या संशयित आरोपींनी गुंतवणूकदारांची 13.48 कोटी रुपयाहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. नरीमन पॉइंट इथल्या एका भाजी विक्रेत्याने या घोटाळ्याची पहिली तक्रार केली होती. त्यानंतर या ज्वेलर्सच्या बाहेर गुंतवणूकदारांची रांगच रांग लागली आहे. गुंतवणूकदार आपली जमा केलेली रक्कम तरी मिळावी अशी मागणी करत आहेत. आम्हाला चांगले रिटर्नस देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण आमचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत. नफा तर आलाच नाही, पण गुंतवलेले पैसेही मिळाले नाहीत, असं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे.
या काळात झाला घोटाळा
प्रदीप कुमार वैश्य यांनी या प्रकरणाची पहिली तक्रार केली होती. 21 जून 2024 पासून ते 30 डिसेंबर 2024 च्या दरम्यान हा घोटाळा झाला आहे, असं वैश्य यांचं म्हणणं आहे. सुरुवातीला कंपनीने चांगले रिटर्नस दिले. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. 30 डिसेंबर 2024 रोजी ज्वेलर्सचं शटर डाऊन झालं. आमचे पैसे बुडाले, असं वैश्य आणि इतर सहा गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे.
13 कोटी गुंतवले
दादरच्या टोरेस कंपनीच्या समोरच भाजी विक्रेता म्हणून काम करणाऱ्या प्रदीपकुमार वैश्य यांनी टोरेस कंपनीत टप्प्याटप्प्याने 13 कोटीपेक्षा जास्त रक्कम गुंतवली. फेब्रुवारी महिन्यात दादरमध्ये या कंपनीच कार्यालय उघडलं तेव्हा प्रदीपकुमारने त्याकडे दुर्लक्ष केलं. पण जून महिन्यापर्यंत बऱ्याच गुंतवणूकदाराना चांगले पैसे परतावा म्हणून मिळत असल्याने प्रदीपकुमारनेही पैसे गुंतवायला सुरुवात केली. आधी स्वतःच्या नावे नंतर कुटुंबातील सदस्यांच्या आणि त्यानंतर मित्रांच्या नावे असे तब्बल 13 कोटी रुपये प्रदीप कुमारने या कंपनीत गुंतवले. सुरुवातीचे काही आठवडे व्यवस्थित मिळणारा परतावा डिसेंबर महिन्यात बंद झाला आणि जानेवारी महिन्यात या कंपनीचे अधिकारी गायब झाले. तीन जण सध्या अटकेत असेले तरी तेच मुख्य सूत्रधार आहेत की हा मोठा प्रश्न आहे.
पोलिसांनी अटक करावी
कंपनीचा दिखाऊपणा बघून आणि लोकांना येत असलेले रिटर्न बघून मी पैसे गुंतवले. मी माझ्या कुटुंबातील सर्वांच्या नावाने पैसे गुंतवले. टोरेस कंपनी अशी बंद होईल असं वाटलं नव्हतं. म्हणूनच मित्रांचे आणि काही व्यवसायिकांचे पैसे गुंतवले. दीड कोटींच कर्ज घेऊन चांगला परतावा मिळेल म्हणून टोरेसमध्ये गुंतवणूक केली. आता पैसे मिळतील की नाही ही भीती वाटतेय. पोलिसनी तपास करून आमची फसवणूक करणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी प्रदीप कुमार वैस्य यांनी केली आहे.
इन्स्टावर तो व्हिडिओ कसा आला?
कोट्यावधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस कंपनीचे इन्स्टाग्राम अकाउंट कोण हँडल करतय? इन्स्टाग्राम कुठून आणि कोण ऑपरेट करतंय याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे. टोरेसचा सीए अभिषेक गुप्ताचा पोलीस ठाण्यातला व्हिडिओ टोरेसच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड झाल्यांमुळे आश्चर्य व्यक्त केल जातंय. गुंतवणूकदरांची फसवणूक करून कोट्यवधी रुपये घेऊन काही आरोपी फरार झालेत तर काही आरोपी अटकेत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून सीए अभिषेक गुप्ताची चौकशी सुरू आहे. गुप्ता चौकशीला आल्यानंतर त्याचा पोलीस ठाण्यातला व्हिडिओ बाहेर कसा गेला याचीही चौकशी केली जाणार आहे. टोरेसच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आरोपींच्या अटकेसंदर्भात आणि आणि टोरेस कार्यालयात झालेल्या तोडफोडीचे व्हिडिओही बनवून अपलोड करण्यात आले आहेत.
पथक टोरेसच्या कार्यालयात
दरम्यान, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक टोरेसच्या कार्यालयात पंचनामा करण्यासाठी दाखल झालं आहे. दादरच्या टोरेस कार्यालयातील लॉकरमध्ये 5 ते 6 कोटी रोख अजूनही असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. तर आतापर्यंत दादर कार्यालयाशी संबधित 3 बॅक खाती पोलिसांनी जप्त केलेली आहेत. टोरेस कंपनीच्या या 3 खात्यात 11 कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.