नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 10 येथील सागर दर्शन सोसायटीमध्ये राहणाऱ्या दोन सख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (2 ऑगस्ट) संध्याकाळी समोर आली आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांचा तपास सुरु आहे. दोघी बहिणींनी आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी शेजारच्यांना घरातून दुर्गंध येऊ लागला. त्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला.
ऐरोली सेक्टर 10 येथील सागर दर्शन सोसायटीमधील बिल्डिंग नं बी-15, रुम नंबर 2:3 येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या दोघी बहिणींनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मी पंथारी (33) आणि स्नेहा पंथारी (26) असं आत्महत्या केलेल्या दोघी बहिणींची नावे आहेत. या दोघी बहिणी सुशिक्षित असून लहान मुलांचे क्लासेस घेऊन आपला उदरनिर्वाह करीत होत्या. दोघी बहिणींच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे. तर दहा वर्षांपूर्वी त्यांच्या आईने सुद्धा आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे.
दोघी बहिणींचा सोसायटीमध्ये त्यांच्या शेजारचा कोणाहीसोबत अधिक संपर्क नव्हता. दोन दिवस दरवाजा बंद असल्याने अचानक दुर्गंधी सुटल्याने आसपासच्या रहिवाश्यांनी दरवाजा ठोकला. पण प्रतिसाद मिळाला नाही म्हणून शेजारच्या रहिवाशांनी माजी नगरसेवक सुरेश भिलारे, विजय चौगुले, मामित चौगुले यांना याबाबत माहिती दिली.
यानंतर माजी नगरसेवकांनी घटनास्थळी खातरजमा केल्यावर पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी दरवाजा तोडल्यावर आतमध्ये दोन तरुणीचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. कोरोनाच्या काळात आर्थिक विवंचेतून या दोन्ही बहिणींनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.