मुंबई : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आफताब श्रद्धाला मारहाण करत असल्याचे उघडकीस आले आहे. आफताब वारंवार गळा दाबून श्रद्धाला मारहाण करत असल्याची तक्रार 23 नोव्हेंबर 2020 रोजी दिली होती. त्यानंतर 19 डिसेंबर 2020 रोजी तिने तक्रार मागेही घेतली होती. नासासोपारा पूर्व येथील तुळिंज पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली होती.
श्रद्धाने तक्रार दाखल केल्यानंतर जवळपास महिनाभराने तक्रार मागे घेतली होती. मात्र या महिनाभरात पोलिसांनी आफताबवर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे तुळिंज पोलिसांनी कारवाई का केली नाही?, तिने केस मागे घेईपर्यंत वाट का बघितली? प्रश्न उपस्थित झाला आहे.
श्रद्धाच्या तक्रारीची माहिती देण्यास तुलिंज पोलिसांनी टाळाटाळ केली असून, आम्ही ही माहिती दिल्ली पोलिसांना देणार असे सांगितले. मात्र त्याचवेळी आफताबवर कडक कारवाई झाली असती तर कदाचित एवढे मोठे हत्याकांड वाचले असते.
आफताब श्रद्धाला नेहमी मारहाण करीत असे. काल श्रद्धाचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा दिसत आहेत. मारहाणीमुळे श्रद्धाला तीन दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागले होते.
श्रद्धा हत्याकांड प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक वसईत शुक्रवारी दाखल झाले आहे. या पथक वसईतील माणिकपूर पोलिसांना सोबत घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहे.
दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर आणि आफताब-श्रद्धा ज्या घरात भाड्याने राहत होते, त्या घरमालकाचाही जबाब नोंदवला.