ठाणे : उल्हासनगरच्या (Ulhasnagar Crime News) डामाराम साहिब मंदिरात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या 4 दरोडेखोरांना विठ्ठलवाडी पोलिसांनी (Vithalwadi Police) बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वी या दरोड्यात सहभागी असलेल्या 4 दरोडेखोरांना ठाणे गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या होत्या. त्यामुळे आता एकूण अटक केलेल्या दरोडेखोरांची (Robbers) संख्या 8 वर गेलीये.
उल्हासनगरच्या श्रीराम चौकात स्वामी डामाराम साहिब दरबार मंदिर आहे. या मंदिरात 30 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. यामध्ये पुजारी जॅकी जग्यासी यांच्या घरातून तब्बल 10 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटून नेला होता. या प्रकरणाच्या तपासात विठ्ठलवाडी पोलिसांनी अनिलसिंग दुधानी, शिवा बाबू निंबाळकर, सुनील उर्फ मुसा कुरणे आणि राजकुमार कुरणे या चौघांना अटक केली. तर ठाणे गुन्हे शाखेनं यापूर्वीच अकबर खान, आसिफ शेख, शिवलिंग शिकलकर आणि राहुलसिंग जुनी या चौघांना अटक केली होती.
यापैकी अनिल दुधानी हा या टोळीचा प्रमुख आहे. त्याच्यावर आत्तापर्यंत मोक्कासह एकूण 18 गुन्हे दाखल आहेत. तर शिवलिंग शिकलकर याच्यावर 12, अकबर खान याच्यावर 4, राहुलसिंग जुनी याच्यावर 4, आसिफ शेख याच्यावर 3, तर शिवा बाबू निंबाळकर याच्यावर पूर्वीचा 1 गुन्हा दाखल आहे. या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं सर्व दरोडेखोरांना 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेल्या इको गाडीसह एकूण 2 कार, 2 रिक्षा आणि 2 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. तर चोरलेल्या सोन्याच्या लगडी, चोरून नेलेला सीसीटीव्हीचा डिव्हीआर, दरोड्यात वापरलेली हत्यारं देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. कल्याणचे अतिरीक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.
30 ऑगस्टला दरोडा टाकला होता. धक्कादायक बाब म्हणते यानंतर दरोडेखोरांनी अशाच पद्धतीने आणखी एक दरोडा टाकण्याचा डाव आखला होता. अंबरनाथ शहरातील एका नामांकित व्यक्तीच्या घरी ते दरोडा टाकणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी दरोडेखोरांचा डाव उधळला आणि त्यांना बेड्या ठोकल्या. दरम्यान, या दरोडेखोरांच्या अटकेमुळे 2 महिन्यांपूर्वी अंबरनाथमध्ये डॉक्टरांच्या घरावर पडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याबाबतही पोलिसांना माहिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.