उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये चोरीच्या वाढत्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. आता तर दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या दोन्ही घटनांनी उल्हासनगरमध्ये चोरांचा सुळसुळाट असल्याचं अधोरेखित केलंय. एका घटनेत ग्राहक बनून आलेल्या एका भामट्याने मोबाईल चोरुन नेलाय. तर दुसऱ्यानं चक्क इमारतीच्या पार्किंग परिसरातून दुचाकी पळवली. या दोन्ही घटनांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या दोन्ही घटना लोकांसोबतच दुकानदारांचीही डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत. चोरांना आळा बसावा म्हणून सीसीटीव्ही लावण्यात आले खरे. पण सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या दोन्ही घटनांनंतर आता चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.
उल्हासनगरच्या गोलमैदान परिसरात कला निवास नावाची इमारत आहे. या इमारतीच्या पार्किंगमध्ये सुदीश मायाने यांनी त्यांची दुचाकी पार्क करून ठेवली होती. मात्र रात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्यानं ही दुचाकी चोरून नेली.
आपली ओळख पटू नये, यासाठी या चोरट्याने डोक्यात टोपी आणि तोंडाला मास्क लावला होता. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
#cctvfootage : उल्हासनगर : इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी पळवणारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, शांतपणे बाईक बाहेर काढली आणि सराईतपणे भामटा स्कूटी घेऊन पसार (VC : निनाद करमरकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी) pic.twitter.com/Cwagcoo8nL
— Siddhesh Sawant (@ssidsawant) December 13, 2022
दुसरीकडे उल्हासनगरात गिऱ्हाईक बनून आलेल्या एका भामट्याने दुकानातील कर्मचाऱ्याचा मोबाईल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना देखील सीसीटीव्हीत कैद झालीये.
दुकानात ग्राहक बनून आला, मोबाईल चोरुन गेला, ही पण चोरी उल्हासनगरचीच! उल्हासनगरचं नाव बदलून चोरनगर केलं तर आश्चर्य वाटायला नको… चोरांचा सुळसुळाट झालाय नुसता.. (VC : निनाद करमरकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी) #Ulhasnagar pic.twitter.com/s2CusTi5fV
— Siddhesh Sawant (@ssidsawant) December 13, 2022
उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील मुख्य बाजारपेठेत लालचंद पसारी नावाचं दुकान आहे. या दुकानात सोमवारी एक भामटा खरेदीच्या निमित्तानं आला. यानंतर दुकानातील कर्मचाऱ्याला काहीतरी दाखवण्यास सांगून त्याची पाठ वळताच या भामट्यानं दुकानातील कर्मचाऱ्याचा मोबाईल घेऊन पळ काढला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेतायत