उल्हासगर : रूम भाड्याने दिला नाही म्हणून वृद्ध मालकिणीसह तिच्या मुलाला मारहाण करण्यात आल्याची घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime) घडली. याप्रकरणी पोलिसांनी (Ulhasnagar Police) दोन आरोपींना बेड्या ठोकल्यात. तसंच त्यांच्याकडून एक पिस्तुल आणि एक सुरा हस्तगत करण्यात आलाय. उल्हासनगरच्या कॅम्प एक मधील साधुबेला शाळेजवळ उषा सुरेंद्र सिंग या वास्तव्याला आहेत. त्यांच्या घराच्या बाजूलाच अजय पवार (Ajay Pawar) हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तरुण वास्तव्याला आहे. उषा सिंग यांचं घर दुमजली असून त्यांच्या घराच्या वरचा मजला अजय याला भाड्याने हवा होता. मात्र अजयची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता उषा यांनी त्याला घर भाड्याने देण्यास नकार दिला. याचाच राग मनात धरून अजय पवार आणि त्याच्या इतर 3 साथीदारांनी आधी 2 एप्रिल रोजी उषा यांचा मुलगा शिवजीत याला मारहाण केली होती. यानंतर पुन्हा 8 मे रोजी रात्री अजय पवार आणि त्याचा मित्र अमित माखिजा यांनी उषा यांच्यासह त्यांचा मुलगा इंद्रजित याला मारहाण केली.
या दोन्ही गुन्ह्यात पोलीस आरोपींचा शोध घेत असतानाच हे दोघे नेहरू नगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्या अंगझडतीत एक देशी पिस्तुल, एक जिवंत राऊंड, एक सुरा पोलिसांनी जप्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, मारहाण करणारे तडीपार गुन्हेगार असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. अजय पवार आणि अमित माखिजा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहे.
अटक करण्यात आलेले अजय पवार आणि अमित माखिजा हे दोघेही रेकॉर्डवरील गुंड आहेत. या दोघांनाही 2020 साली तडीपार सुद्धा करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर सलग दोन मारहाणीच्या केसेस, अवैध बंदूक आणि शस्त्र बाळगणे अशा केसेस झाल्यानं दोघांनाही स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आलीये.